संरक्षणदलांकरीता रणगाडाभेदी ‘एटी४’साठी भारताचे ‘साब’ला कंत्राट

नवी दिल्ली – लष्कर आणि वायुसेनेसाठी ‘एटी४’ या रणगाडाभेदी अस्त्राची खरेदी केली जाणार आहे. स्विडीश कंपनी ‘साब’ला याचे कंत्राट देण्यात आले आहे. किती प्रमाणात ‘एटी४’ची खरेदी केली जाणार आहे, याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. मात्र ‘एटी४’ हे पायदळाकडील चिलखती वाहने आणि शत्रूची बांधकामे व हेलिकॉप्टर्सवर हल्ला करण्यासाठी प्रभावी अस्त्र सिद्ध होईल, असा दावा केला जात आहे.

संरक्षणदलांकरीता रणगाडाभेदी ‘एटी४’साठी भारताचे ‘साब’ला कंत्राटलष्कर व वायुसेनेसाठी रणगाडाभेदी अस्त्राच्या खरेदीकरीता स्पर्धात्मक कार्यक्रमाअंतर्गत निविदा मागविण्यात आल्या होत्या. यातून ‘एटी४’ची निवड करण्यात आली आहे. ‘एटी४’ साब बोफोर्स डायनामिक या स्विडनच्या कंपनीने विकसित केलेले सिंगल शॉट अस्त्र असून स्विडनच्या लष्करात हे गेली कित्येक वर्ष दाखल आहे. याशिवाय कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, इराक, पोलंड, तैवान, कोलंबिया, व्हेनेझुएला यासह कित्येक देशांच्या लष्कराकडून ‘एटी४’चा वापर केला जातो.

‘एटी४’ ही प्री-लोडेड अस्त्र प्रणाली आहे. तसेच ३०० मीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. केवळ आठ किलो वजनाच्या आणि ८४ एमएम बोअरच्या लॉन्चरने सहज मारा करता येणार्‍या ‘एटी४’द्वारे लष्कराचे रणगाडे आणि चिलखती वाहनांना अचूकतेने लक्ष्य करता येऊ शकते. याशिवाय शत्रूंनी उभारलेली बांधकामे, बंकर्स, लॅण्डिंग क्राफ्ट अर्थात छोटी जहाजे, हेलिकॉप्टर्स याशिवाय शत्रूच्या लपलेल्या ठिकाणांनाही उद्ध्वस्त केले जाऊ शकते. भारतीय संरक्षणदलांसाठी ‘एटी४’ कंत्राट आपल्याला मिळाल्याची माहिती गुरुवारी साब इंडियानेच जाहीर केली आहे.

पाकिस्तान आणि चीन सीमेवरील वाढलेली आव्हाने बघता भारत सुरक्षेच्या दृष्टीने वेगाने शस्त्रांची खरेदी करीत आहे व संरक्षणदलांना अधिक बळकट करीत आहे. ‘एटी४’ अस्त्रांची खरेदी याचाच भाग आहे.

leave a reply