कृषी निर्यात ५० अब्ज डॉलर्सवर पोहोचणार

- वाणिज्य मंत्रालयाचा दावा

नवी दिल्ली – देशातून कृषी उत्पन्नाची निर्यात ५० अब्ज डॉलर्सच्या पुढे जाणार असल्याचा दावा केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात देशाची कृषी निर्यात ४१.८ अब्ज डॉलर्स इतकी नोंदविण्यात आली होती. यानुसार गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी कृषी निर्यातीत एकूण २० टक्के वाढीची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ३१.०५ अब्ज इतकी कृषी निर्यात देशातून झाली होती.

कृषी निर्यात ५० अब्ज डॉलर्सवर पोहोचणार - वाणिज्य मंत्रालयाचा दावाभारत पहिल्यांदाच कृषी उत्पादनाची निर्यातीच्या बाबतीत ५० अब्ज डॉलर्सचा विक्रमी टप्पा ओलांडू शकतो, असा अंदाज वाणिज्य मंत्रालयाने व्यक्त केला आहे. देशात विविध कृषी उत्पादनाची निर्यात सतत वाढ होत आहे. निर्यातदारांच्या समस्या सोडविल्याने व निर्यात सुलभ प्रक्रियांमुळे निर्यातीत वाढ झाली आहे. कोरोना संकटाच्या काळातही वाणिज्य मंत्रालयाने कृषी निर्यात वाढावी यासाठी अनेक पावले उचलली. त्याचा हा परिणाम आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

यामध्ये प्रामाणिकिकरणाची सुलभ करण्यात आलेली प्रक्रिया, निर्यात प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन करण्यात आलेली व्यवस्था आणि चाचण्यासाठी प्रयोगशाळांच्या संख्येत करण्यात आलेली वाढ या गोष्टींकडे वाणिज्य मंत्रालयाने लक्ष वेधले. यामुळे जागतिक मागणी पूर्ण करण्यात भारत महत्त्वाची भूमीका बजावत असल्याचा दावाही वाणिज्य मंत्रालयाने केला आहे.

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या पहिल्या आठ महिन्याच्या काळात ३१.०५ अब्ज डॉलर्सची कृषी निर्यात झाली आहे. यामध्ये सागरी उत्पादनांची निर्यात, तसेच प्लॅन्टेशन गुड्स अर्थात कापूस, कॉफी, चहा, तेल बियाणे यासारख्या उत्पादनांचा समावेश आहे. सध्या निर्यातीत झालेली वाढ पाहता ५० अब्ज डॉलर्स कृषी निर्यातीचा ऐतिहासिक टप्पा भारत ओलांडेल, असा विश्‍वास वाणिज्य मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

देशातून तांदूळ निर्यात यावर्षी २.२० कोटी टनावर पोहोचेल, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. बिगर बासमती तांदूळ, गहू, साखरेची निर्यात वाढली आहे. याचा फायदा पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना होत असल्याचेही वाणिज्य मंत्रालयाने अधोरेखित केले. तसेच सागरी उत्पादनांची निर्यातही पहिल्यांदाच आठ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा टप्पा गाठेल. तर मासाल्यांची निर्यातही ४.८ अब्ज डॉलर्सवर पोहोचेल, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच कॉफी निर्यातीतही ३५ टक्क्यांची वाढ अपेक्षित असून केरळ, कर्नाटक, तमिळनाडू या दक्षिणेकडील राज्यातून कॉफी निर्यात वाढल्याचे वाणिज्य मंत्रालयाने सांगितले.

सरकार कृषी निर्यात वाढावी यासाठी विविध उत्पादनांसाठी क्लस्टर बनवित आहे. सोलापूरमध्ये डाळिंब, अनंथपूरमध्ये केळी, वाराणसीत भाज्या व आंब्यासाठी क्लस्टर विकसित केला जात असल्याची माहितीही वाणिज्य मंत्रालयाने दिली.

leave a reply