भारताने जलदगतीने हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करावे

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली – शत्रूला दमदार प्रत्युत्तर देण्याची क्षमता कायम राखण्याची असेल तर भारताने हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करण्यावर भर द्यायला हवा, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. भारताने संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडी मिळविण्याची गरज असून जगातील काही मोजक्याच देशांकडे असणारे तंत्रज्ञान भारतीय संरक्षणदलांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते, राजनाथ सिंग पुढे म्हणाले. डीआरडीओने आयोजित केलेल्या परिसंवादात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी युद्धात आता ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’सह रोबोटिक्स, माहिती तंत्रज्ञान, स्पेस, सायबर व बिग डाटा ऍनालिसिससारख्या नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, याकडे लक्ष वेधले.

भारताने जलदगतीने हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करावे - संरक्षणमंत्री राजनाथ सिंगकाही दिवसांपूर्वीच चीनने एकापाठोपाठ एक अशा दोन हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या चाचण्या घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. चीनच्या या चाचण्यांनी अमेरिकेतही खळबळ उडाली होती. चीनने चाचणी केलेले हायपरसोनिक तंत्रज्ञान जगातील कोणत्याच देशाकडे नसल्याचे दावेही पुढे आले होते. दुसर्‍या बाजूला चीन भारतीय सीमेवरील संरक्षणतैनाती वाढवित असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय वैज्ञानिक व संशोधकांना केलेले आवाहन लक्ष वेधून घेणारे ठरते.

मंगळवारी नवी दिल्लीतील संरक्षण संशोधन व विकास संस्था ‘डीआरडीओ’च्या मुख्यालयात ‘प्रिपेरिंग फॉर फ्युचर’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित अधिकारी व संशोधकांसमोर बोलताना संरक्षणमंत्र्यांनी हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याची योजना मांडली. ‘जगातील काही मोजक्या देशांकडे उपलब्ध असलेले तंत्रज्ञान आता भारतातही तयार होणे गरजेचे आहे. गेल्या काही काळात मिसाईल डिफेन्स यंत्रणा अधिकाधिक प्रगत स्वरुपात सक्रिय होत असल्याचे दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर शत्रूला प्रत्युत्तर देण्याची क्षमता कायम राखण्यासाठी भारताने हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी वेग द्यायला हवा’, असे राजनाथ सिंग म्हणाले.

हायपरसोनिक क्षेपणास्त्रासारखे तंत्रज्ञान भारताच्या संरक्षणक्षेत्रात क्रांतिकारी बदल घडविणारे ठरु शकते व त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे, याची जाणीवही संरक्षणमंत्र्यांनी यावेळी करून दिली. भारताने संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात नेतृत्त्व करायला हवे व यावर आपला सर्वाधिक भर असायला हवा, असेही राजनाथ सिंग पुढे म्हणाले. यावेळी झालेल्या एका सोहळ्यात संरक्षणमंत्र्यांनी ‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या पाच यंत्रणा संरक्षणदलांना सुपूर्द केल्या. त्यात ‘अँटी ड्रोन सिस्टिम’, ‘मोड्युलर ब्रिज टेक्नॉलॉजी’, ‘स्मार्ट अँटी एअरफिल्ड वेपन’, ‘शॅफ व्हेरिअंटस्’ व ‘लाईटवेट फायरफायटिंग युनिट’चा समावेश आहे.

leave a reply