भारत ‘एस-५००’ खरेदी करणारा पहिला देश ठरेल

- रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा

मॉस्को – रशियाची अतिप्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा ‘एस-५००’चा भारत हा पहिला ग्राहक असू शकतो, असे रशियाच्या उपपंतप्रधानांनी म्हटले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या नुकत्याच पार पडलेल्या भारत दौर्‍यात दोन्ही देशांमध्ये ‘एस-५००’वर चर्चा पार पडल्याचे दावे केले जातात. मात्र भारताने याबाबत अधिकृत पातळीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र भारत व रशिया यांच्यातील संरक्षण सहकार्याकडे अत्यंत बारकाईने पाहणार्‍या अमेरिका व चीनसाठी रशियाच्या उपपंतप्रधानांनी केलेला दावा हा मोठा धक्का ठरू शकतो. कारण हे दोन्ही देश भारत व रशियाच्या लष्करी सहकार्याकडे आव्हान म्हणून पाहत आहेत.

भारत ‘एस-५००’ खरेदी करणारा पहिला देश ठरेल - रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावाभारताने रशियाकडून ‘एस-४००’ या प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणेची खरेदी केली असून याच्या दोन बॅटरिज् भारतात दाखल झाल्या आहेत. लडाखपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या एलएसीवर भारत ही हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात करू शकतो. ही बाब चीनला अस्वस्थ करणारी ठरते. कारण चीनला रशियाने पुरविलेल्या एस-४००पेक्षा रशियाने भारताला पुरविलेली एस-४०० ट्रायम्फ अधिक अद्ययावत आहे. शिवाय रशियाबरोबर हा व्यवहार केल्यानंतर, चीनला अमेरिकेचे निर्बंध सहन करावे लागले होते. मात्र भारतावर असे निर्बंध टाकण्याचा निर्णय घ्यायला अमेरिका तयार नाही. ही बाब देखील चीनला खटकत आहे.

अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने एस-४०० च्या व्यवहारावरून भारतावर निर्बंध टाकले जाऊ शकतात, असे धमकावले होते. त्याची पर्वा न करता भारताने रशियाबरोबरील हा व्यवहार पूर्ण केला. यावेळी भारताला निर्बंधांच्या कचाट्यात अडकवणार नाही, पण पुढच्या काळात भारताने रशियाबरोबर अशा स्वरुपाची लष्करी खरेदी केली तर मात्र अमेरिका भारतावर निर्बंध लादल्याखेरीज राहणार नाही, भारत ‘एस-५००’ खरेदी करणारा पहिला देश ठरेल - रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावाअसे संकेत बायडेन प्रशासनाकडून दिले जात आहे. भारत सरकार या इशार्‍यांकडे फारसे लक्ष द्यायला तयार नाही.

अशा परिस्थितीत रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरिसोव्ह यांनी ‘एस-५०० प्रॉमेथस्’ या अतिप्रगत हवाई सुरक्षा यंत्रणेचा पहिला खरेदीदार भारत असू शकेल, असे जाहीर केले. ही यंत्रणा ६०० किमी अंतरावरील क्षेपणास्त्रे, ड्रोन्स, लढाऊ विमाने सहजपणे टिपू शकते. अद्याप भारताने याच्या खरेदीबाबतची भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र आपल्या सुरक्षेसाठी भारत आवश्यक असलेली शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याची खरेदी करील आणि याबाबत दुसर्‍या देशांच्या आक्षेपांचा विचार करणार नाही, असे भारतीय नेत्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे एस-५००च्या खरेदीचा निर्णय केवळ सामरिकच नाही, तर धोरणात्मक व राजकीयदृष्ट्या भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचवेळी भारताला ही अतिप्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविण्यास आपण तयार आहोत, हे जाहीर करून रशियाने आपण चीनच्या दडपणाखाली येणार नाही, असा स्पष्ट संदेश दिल्याचे दिसत आहे.

leave a reply