भारताने ‘क्वाड’मध्ये अधिक सक्रिय भूमिका पार पाडावी – अमेरिकेच्या माजी परराष्ट्र उपमंत्री एलिस वेल्स

वॉशिंग्टन – अमेरिकेसह भारत-जपान व ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या ‘क्वाड’मध्ये भारताने अधिक सक्रिय भूमिका पार पाडावी, असा सल्ला अमेरिकेच्या माजी परराष्ट्र उपमंत्री एलिस वेल्स यांनी दिला आहे. वेल्स यांनी दक्षिण व मध्य आशियाच्या प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. समान मूल्य व हितसंबंध जपणाऱ्या भागीदार देशांबरोबर सहकार्य वाढविण्याऐवजी ‘ब्रिक’ व ‘आरआयसी’च्या भेटीसाठी वेळ घालविणे योग्य ठरणार नाही, असेही वेल्स यांनी बजावले. वेल्स यांचे हे विधान भारताने चीनविरोधात अधिक सुस्पष्ट भूमिका स्वीकारावी, अशी मागणी करीत आहे. गेल्या काही दिवसात भारताने चीनच्या विरोधात घेतलेले आक्रमक निर्णय पाहता चीनबाबतची भारताची भूमिका अधिक निर्णायक बनत चालल्याचे उघड होत आहे.

गलवान खोर्‍यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. चीनने केलेल्या हल्ल्यानंतर झालेल्या बैठकांमध्ये, भारताने चीनला चूक त्यांचीच असल्याचे आणि यापुढे चीनवर विश्वास टाकता येणार नाही असे स्पष्ट शब्दात सुनावले होते. भारताने चीन सीमेवरील लष्करी तैनातीही वाढविली असून आर्थिक पातळीवरही चीनला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. राजकीय पातळीवरही भारताने चीनला पुन्हा आगळीक घडल्यास मोठ्या परिणामांची तयारी ठेवा, असा उघड इशारा दिला आहे.

भारताच्या चीनसंदर्भातील धोरणात हा आक्रमक बदल दिसत असतानाच अमेरिकेच्या माजी उपमंत्री वेल्स यांनी दिलेला सल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो. वेल्स यांनी, अमेरिकेच्या एका दैनिकात भारत-चीन तणावासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या लेखावर प्रतिक्रिया नोंदविताना, चीनविरोधातील धोरणाची व्याप्ती भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरही वाढवावी असे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी ‘क्वाड’चा संदर्भ वापरला आहे.

२००७ साली जपानच्या पुढाकाराने झालेल्या चार देशांच्या अनौपचारिक बैठकीला ‘क्वाड’ असे म्हटले गेले होते. जपानसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया व भारताचा समावेश असलेला हा गट सुरुवातीच्या काळात फारसा सक्रिय नव्हता. मात्र २०१७ साली झालेल्या ‘आसियन’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर ‘क्वाड’ सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. याच बैठकीत चीनच्या साऊथ चायना सीमधील वाढत्या कारवाया रोखण्यासाठी ‘क्वाड’ सक्रिय करण्यावर एकमत झाले. त्यानंतर गेल्या तीन वर्षात हा गट चीनविरोधातील प्रमुख आघाडी म्हणून आकारास येत असून चीननेही त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

असे असले तरी भारताचा ‘क्वाड’ मधील सहभाग जपान व ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत कमी पडतो, असे अमेरिकेचे मत आहे. चीनने अमेरिकेला शह देण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमांमध्ये भारताचा सहभाग आहे. ‘क्वाड’चा सदस्य असतानाही, भारताकडून चीनचा सहभाग असणाऱ्या उपक्रमांना देण्यात येणारे महत्त्व अमेरिकेला खटकत असल्याचे वेल्स यांनी लक्षात आणून दिले. अमेरिकेच्या नेतृत्वाने उघडपणे चीनविरोधात संघर्ष सुरू केला असताना भारताने अशा प्रकारे धोरण स्वीकारणे विसंगत दिसते, असे एलिस वेल्स यांनी भारताला बजावले आहे.

वेल्स यांनी यापूर्वीही चीनचा धोका व भारताचे सहकार्य या मुद्यावर सूचक विधाने केली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या जगाच्या नव्या आर्थिक फेररचनेत चीनच्याविरोधात समविचारी देशांचे एकत्र येणे ही लक्षवेधी बाब ठरते, असे वेल्स गेल्या महिन्यात म्हणाल्या होत्या. त्याचवेळी वेल्स यांनी अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियामधील क्वाड सहकार्याचा विशेष उल्लेखही केला होता. तसेच चीनचे सर्वच देशांबरोबर सुरु असलेले सीमावाद चीनपासून असलेला धोका अधोरेखित करत आहे, असे सांगून वेल्स यांनी चीन जगासाठी धोकादायक असल्याचे संकेत दिले होते.

चीन हा भारताचा शेजारी देश व सर्वात मोठा व्यापारी भागीदार असला तरी गेल्या काही वर्षातील चीनच्या कारवाया शेजारी व भागीदार या दोन्हींना काळीमा फासणाऱ्या ठरल्या आहेत. चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट आपल्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी वेगवान हालचाली करीत आहे. हे करताना आंतरराष्ट्रीय कायदे व नियम धुडकवण्यात येत असून लोकशाहीवादी मूल्यांची गळचेपी सुरू आहे.

आर्थिक व लष्करी बळाच्या जोरावर यांच्या सत्ताधारी राजवटीने आपली मनमानी सुरू केली आहे. चीनचा हा प्रभाव रोखण्यासाठी अमेरिका पुढे सरसावली असून उघड संघर्षाचे धोरण स्वीकारले आहे. या पार्श्वभूमीवर, भारताने अमेरिकेला साथ देणे आवश्यक असून त्यासाठी चीनविरोधातील संघर्षात अधिक सक्रीय होणे आवश्यक आहे, असे संकेत वेल्स यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत

leave a reply