भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या साडेपाच लाखांनजीक

नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडेपाच लाखांजवळ पोहोचली आहे. रविवार सकाळपर्यँत देशात कोरोनाबाधितांची संख्या ५,२८,८५९ वर पोहोचली होती. रात्री विविध राज्यांकडून जाहीर माहितीनुसार त्यात आणखी सुमारे २० हजार रुग्णांची भर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात ५,४९३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तामिळनाडूत ३,९४० तर दिल्लीत २,८८९ नवे रुग्ण आढळले. या तीन राज्यातच १२ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी शनिवारी दिवसभरात १९,९०६ नवे रुग्ण आढळले होते.

रविवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या १६७ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच सलग तिसऱ्या दिवशी पाच हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. मुंबईत ६४ जणांचा बळी गेला असून १,२८७ नवे रुग्ण आढळले. मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७५ हजारांच्या पुढे गेली आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३४ हजारांवर गेली आहे.

तामिळनाडूत रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून आली असून चेन्नईत सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तामिळनाडूमध्ये कोरोनाने २४ तासात ५४ जणांचा बळी गेला आहे, तर ३,९४० नवे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत ६५ जण दगावले असून सुमारे तीन हजार नवे रुग्ण आढळले. कर्नाटकात १२६७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन ३० जूननंतरही कायम राहणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र नियम शिथिल करण्याची प्रक्रिया सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मणिपूरनेही १५ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली आहे. तेलंगणा सरकारनेही लॉकडाऊन कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

leave a reply