संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगामध्ये भारताने खोटे आरोप करणाऱ्या पाकिस्तानचे वाभाडे काढले

पाकिस्तानचे वाभाडेजीनिव्हा – पाकिस्तानातील कुठलाही धार्मिक अल्पसंख्यांक समुदाय सुखरूप राहिलेला नाही, अशा शब्दात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगात भारताने पाकिस्तानचे वाभाडे काढले. पाकिस्तानच्या उपपरराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी भारतावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना भारताच्या प्रतिनिधी सीमा पुजानी यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला. पाकिस्तानातील अहमदिया, ख्रिस्ती, हिंदू व शीख आणि बलोच जनतेच्या मानवाधिकारांची सातत्याने पायमल्ली होत असते, याकडे पुजानी यांनी लक्ष वेधले.

मे महिन्यात जम्मू व काश्मीरमध्ये जी20 च्या काही बैठका संपन्न होणार आहेत. यामुळे पाकिस्तान कमालीचा अस्वस्थ झाला असून या बैठकांमुळे जम्मू व काश्मीरवरील भारताचा प्रभाव अधिकच घट्ट होईल, या चिंतेने पाकिस्तानला सतावले आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगात भारतावर चिखलफेक करून पाकिस्तानच्या उपपरराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती. भारत जम्मू व काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे हनन करीत असल्याचा दावा खार यांनी केला होता. इतकेच नाही तर जगाकडून भारताला प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रे पुरविली जात आहेत व त्यामुळे या क्षेत्रातील समतोल ढासळत असल्याचा ठपकाही पाकिस्तानच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी ठेवला होता.

याला उत्तर देताना भारताच्या सीमा पुजानी यांनी पाकिस्तानातील मानवाधिकारांचे सर्रास हनन होत आहे, याची जाणीव करून दिली. पाकिस्तानात कुठलाही धार्मिक अल्पसंख्यांक असलेला समुदाय सुरक्षित राहिलेला नाही. पाकिस्तानच्याच यंत्रणांनी या देशात गेल्या दशकात बेपत्ता झाल्याच्या 8,463 तक्रारींची नोंद केली होती, याची आठवण करून दिली. बलोच जनतेवर अत्याचार करणाऱ्या पाकिस्तानने महिला, मुले, विद्याथी, डॉक्टर्स व इंजिनिअर्स तसेच बलोच समुदायाच्या नेत्यांचीही गय केली नाही. सातत्याने बलोच नागरिक बेपत्ता होत आहेत, असे सीमा पुजानी म्हणाल्या.

तसेच ईशनिंदाविरोधी कायद्याच्या अंतर्गत धार्मिक अल्पसंख्यांकावर अमानुष अत्याचार केले जात आहेत. पाकिस्तानात ख्रिस्तधर्मियांना सातत्याने लक्ष्य केले जात असून हिंदू व शीख धर्माच्या अनुयायांना पाकिस्तानात छळ सहन करावा लागत आहे. हिंदू व शीखधर्मातील मुली व तरुणींचे अपहरण करून त्यांना जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले जाते. तसेच त्यांच्या धार्मिक स्थळांवर पाकिस्तानात सातत्याने हल्ले चढविले जातात, याचे सांगून पाकिस्तानचा काळाकुट्ट चेहरा पुजानी यांनी जगासमोर आणला.

असा देश भारतद्वेषाने पछाडलेला आहे आणि आपलीच जनता भुकेकंगाल झालेली असताना देखील पाकिस्तान आपला भारतद्वेष सोडून द्यायला तयार नाही. कारण या देशाचा प्राधान्यक्रम कायम चुकत आलेला आहे, असा टोला सीमा पुजानी यांनी लगावला आहे. तसे करण्यापेक्षा पाकिस्तानने आपल्या जनतेच्या कल्याणाकडे अधिक लक्ष केंद्रीत करावे व निराधार आरोप करण्याचे सोडून द्यावे, असे पुजानी यांनी बजावले आहे.

leave a reply