युक्रेनच्या युद्धाने भारताला शस्त्रास्त्रांच्या आघाडीवर आत्मनिर्भर बनण्याचा धडा दिला

- संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान

आत्मनिर्भरनवी दिल्ली – ‘शस्त्रास्त्रांच्या आघाडीवर आत्मनिर्भर बनण्यावाचून पर्यायच नाही. हा महत्त्वाचा धडा भारताला युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धातून मिळालेला आहे’, असे संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी ठासून सांगितले. छोट्या युद्धासाठी अत्यंत प्रगत व अचूकतेने मारा करणाऱ्या आधुनिक शस्त्रास्त्रांची गरज आहे. तर दिर्घकाळ चालणाऱ्या युद्धात पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या निर्मितीच्या आघाडीवर भारताला स्वयंपूर्ण व्हावेच लागेल, असे जनरल चौहान म्हणाले. या दिशेने पावले टाकली जात आहेत. मात्र ही प्रक्रिया अधिकाधिक गतीमान करण्यासाठी तिन्ही संरक्षणदलांनी पुढाकार घ्यायला हवा, असा संदेश यावेळी संरक्षणदलप्रमुखांनी दिला.

नवी दिल्लीत सुरू असलेल्या रायसेना डायलॉग या सुरक्षाविषयक बैठकीत जनरल अनिल चौहान बोलत होते. ‘द ओल्ड, द न्यू अँड द अनकन्व्हेन्शनल: असेसिंग कंटेम्पर्‌‍री कॉन्फ्लिक्टस्‌‍’ या विषयावर बोलताना जनरल चौहान यांनी आत्ताच्या काळातील युद्धविषयक परिस्थितीची जाणीव करून दिली. लष्करी अधिकारी म्हणून युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आपण अभ्यास करून त्याची नोंद घेत आहोत, असे जनरल चौहान यावेळी म्हणाले.

पुढच्या काळात छोट्या आणि जलदगतीने पुढे सरकणाऱ्या युद्धासाठी अत्याधुनिक व अचूकतेने प्रहार करणाऱ्या प्रभावी शस्त्रास्त्रांची आवश्यकता भासेल. सध्या भारत दिर्घकाळ चालणाऱ्या युद्धात गुंतण्याची शक्यता नाही. पण अशा युद्धासाठीही देशाने सज्जता ठेवायला हवी. अशा दिर्घकाळ चालणाऱ्या युद्धाच्या काळात पुरवठा साखळी विस्कळीत होऊन इतर देशांकडून होणारा शस्त्रास्त्रांचा पुरवठा खंडीत होऊ शकतो. त्यामुळे मित्र व सहकारी देश कितीही सहाय्य करीत असले तरी युद्धाच्या काळात शस्त्रास्त्रांसाठी त्यांच्यावर अवलंबून राहता येणार नाही. आपल्याला आवश्यक असलेली शस्त्रास्त्रे देशातच तयार करण्याची क्षमता आपण प्राप्त केली पाहिजे, असे जनरल चौहान यांनी स्पष्ट केले.

दिर्घकाळ चालणाऱ्या युद्धासाठी क्षमता विकसित करायची असेल, तर त्यासाठी संरक्षणाशी निगडीत पायाभूत सुविधांचा विकास करायला हवा. त्याखेरीज हे शक्य नाही, असे सांगून जनरल चौहान यांनी युक्रेनच्या युद्धाचा दाखला दिला. आत्ताच्या काळात रशियन सैन्य युक्रेनच्या बाखमतमध्ये अवघ्या तीन किलोमीटरची आघाडी मिळाली, तरी आपल्याला फार मोठे यश मिळाल्याचा दावा करीत आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात अशा स्वरुपाचा संघर्ष झडायचा, याची आठवण जनरल अनिल चौहान यांनी करून दिली. अलीकडच्या काळातील युद्ध छोटी असतील, हा समज वर्षभराहून अधिक काळ चाललेल्या रशिया व युक्रेनमधील युद्धाने खोडून काढला आहे. त्यामुळे भारताने छोट्या आणि दिर्घकाळ चालणाऱ्या अशा दोन्ही युद्धांसाठी स्वतःला सुसज्ज केले पाहिजे, असे परखड मत जनरल चौहान यांनी मांडले.

दरम्यान, भारत सरकार संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी योग्य ती पावले उचलत असल्याचे सांगून जनरल चौहान यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. त्याचवेळी संरक्षणक्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या आघाडीवर देशाच्या तिन्ही संरक्षणदलांचा पुढाकार अतिशय महत्त्वाचा ठरेल, असे सांगून त्यांच्यामुळे ही आत्मनिर्भरतेची प्रक्रिया अधिक गती पकडेल, असा विश्वास जनरल चौहान यांनी व्यक्त केला आहे.

leave a reply