रशियाबरोबरील इंधनव्यवहारावर आक्षेप घेणार्‍या अमेरिकेला भारताची चपराक

इंधनव्यवहारावर आक्षेपनवी दिल्ली – युक्रेनवर हल्ला चढविणार्‍या रशियाकडून भारताने इंधनाची खरेदी केली, याची नोंद इतिहासात होईल, असे बजावणार्‍या अमेरिकेला भारताने सणसणीत उत्तर दिले. भारताच्या इंधन व्यवहारातील रशियाचा हिस्सा नगण्य आहे. त्याच्या कितीतरी अधिक पटींनी युरोपिय देश रशियाकडून इंधनाची खरेदी करीत आहेत. इंधनाच्या बाबतीत इतरांवर अवलंबून नसलेल्या आणि अजूनही रशियाकडून इंधन खरेदी करणार्‍यांना भारताला यावर उपदेश करण्याचा अधिकार नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने खडसावले.

युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने रशियावर निर्बंधांचा सपाटा लावला आहे. यानुसार अमेरिकेने रशियाच्या इंधन निर्यातीला लक्ष्य केले. रशियातून अमेरिकेत केली जाणारी इंधनाची निर्यात पूर्णपणे रोखण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी घेतला. त्याचवेळी इतर देशांनीही अमेरिकेचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा बायडेन यांनी व्यक्त केली होती. पण एकाएकी रशियाकडून इंधनाची खरेदी थांबविणे शक्य नाही, याचीही आपल्याला जाणीव असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले होते. रशियाकडून अजूनही इंधनाची खरेदी करणार्‍या युरोपिय देशांचा अमेरिका सहानुभूतीने विचार करीत असल्याचे बायडेन यांच्या या उद्गारातून स्पष्ट झाले.

मात्र रशियाकडून इंधनतेलाची खरेदी करणार्‍या भारताबाबत बायडेन प्रशासनाचे धोरण इतके सहानुभूतीपूर्ण नाही. रशियाने भारताला सवलतीच्या दरात इंधन पुरविण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर, अमेरिकेकडून त्यावर प्रतिक्रिया उमटली होती. युक्रेनवर हल्ला चढविणार्‍या रशियाकडून भारताने इंधनाची खरेदी केली, याची नोंद इतिहासात होईल, असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी म्हटले होते. त्याचवेळी भारत-रशियामधील हा इंधनव्यवहार अमेरिकन निर्बंधांच्या कक्षेत येणारा नसल्याचेही साकी यांनी मान्य केले होते.

इंधनव्यवहारावर आक्षेपरशियाबरोबरील भारताच्या इंधन व्यवहारावर अमेरिकेची नजर रोखलेली आहे, हा संदेश याद्वारे बायडेन प्रशासना दिला होता. त्यावर भारताने त्यावर सणसणीत प्रत्युत्तर दिले. इंधनासाठी दुसर्‍या देशांवर अवलंबून नसलेल्यांनी तसेच अजूनही रशियाकडून इंधनाची खरेदी करणार्‍या देशांना भारताला उपदेश करण्याचा अधिकार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. त्याचवेळी भारत रशियाकडून अत्यल्प प्रमाणात इंधनाची खरेदी करीत आहेत. त्याच्या तुलनेत युरोपिय देश मोठ्या प्रमाणात रशियाचे इंधन वापरत असल्याची बाब बागची यांनी लक्षात आणून दिली.

मागणीच्या ८० टक्क्याहून अधिक प्रमाणात भारताला इंधनाची आयात करावी लागते. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे आपल्या इंधनसुरक्षेसाठी भारत सर्वच पर्यायांचा विचार करीत आहे आणि यात रशियाकडून इंधनाच्या खरेदीचाही समावेश आहे, हे बागची यांनी यावेळी ठासून सांगितले. भारताने रशियाकडून सुमारे ३० लाख बॅरल्स इतक्या प्रमाणात इंधनतेलाची खरेदी केल्याचे दावे काहीजणांकडून करण्यात येत आहेत. पुढच्या काळातही आपल्यासमोर रशियन इंधनाचा पर्याय खुला असेल. यात दुसर्‍या कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा संदेश भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांना दिला आहे.

leave a reply