भारताचे श्रीलंकेला १०० कोटी डॉलर्सचे कर्जसहाय्य

कर्जसहाय्यनवी दिल्ली – भारताने आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला आणखी १०० कोटी डॉलर्सचे कर्जसहाय्य घोषित केले. श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे भारताच्या भेटीवर आले असतानाच उभय देशांमध्ये या संदर्भातील करारावर स्वाक्षर्‍या झाल्या. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर उपस्थित होते. या कर्जसहाय्यासाठी श्रीलंकेच्या अर्थमंत्र्यांनी भारताचे आभार मानले.

सध्या श्रीलंका फार मोठ्या आर्थिक संकटात आहे. कोरोनाच्या साथीमुळे श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोलमडली होती. त्यातच चीनकडून मोठ्या व्याजदराने घेतलेल्या कर्जाचा फास श्रीलंकन अर्थव्यवस्थेसमोरील समस्या अधिकच तीव्र करीत आहे. श्रीलंकेतील अन्नधान्याचे उत्पादन घसरले असून यावर्षी श्रीलंकेला भारताकडून अन्नधान्याची आयात करावी लागली होती. त्याचवेळी इंधनाचे दर कडाडल्याने श्रीलंकेची अवस्था दारूण बनलेली आहे. या सार्‍या संकटांवर मात करण्यासाठी श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला भरीव सहाय्याची आवश्यकता आहे. यासाठी श्रीलंकेने भारताला सहाय्याचे आवाहन केले होते.

कर्जसहाय्ययाला प्रतिसाद देऊन भारताने श्रीलंकेला १०० कोटी डॉलर्सचे कर्जसहाय्य पुरविले आहे. या निधीचा वापर करून श्रीलंका भारताकडून अन्न, औषधे व इतर जीवनावश्यक गोष्टी मिळविणार आहे. यासंदर्भातील करार संपन्न झाला असून यावेळी श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे उपस्थित होते. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर देखील यावेळी उपस्थित होते. श्रीलंकेच्या अर्थमंत्र्यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

या भेटीत बासिल राजपक्षे यांनी भारताने आत्तापर्यंत श्रीलंकेला केलेल्या सहाय्यासाठी आभार मानले होते. तर ‘नेबरहूड फर्स्ट’ अर्थात शेजारी देशांना प्राधान्य व सागर (सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन) या दोन्ही योजनांनुसार भारत श्रीलंकेला सर्वतोपरी सहाय्य करील, अशी ग्वाही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेच्या अर्थमंत्र्यांना दिली होती. गेल्याच महिन्यात भारताने श्रीलंकेला ५० कोटी डॉलर्सचे कर्जसहाय्य पुरविले होते. इंधनाच्या खरेदीसाठी श्रीलंकेला हा निधी पुरविण्यात आला होता. दरम्यान, भारताबरोबरील श्रीलंकेचे हे सहाय्य चीनला खुपत असून भारत चीनबरोबरील श्रीलंकेच्या सहकार्याच्या आड येत असल्याची टीका चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी केली होती.

leave a reply