भारत अफगाणी जनतेच्या बाजूने उभा राहिल

- परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची ग्वाही

नवी दिल्ली – अफगाणी जनतेच्या बाजूने भारत नेहमीच उभा राहिल, अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद हनिफ अत्मार यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेत जयशंकर यांनी भारत अफगाणी जनतेसाठी बांधिल असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. ११ सप्टेंबर २०२१ रोजी अफगाणिस्तानातून आपले सारे सैन्य मागे घेण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. यानंतर अफगाणिस्तानातील लोकशाही धोक्यात येईल व गेल्या दोन दशकात अफगाणिस्तानने जे काही मिळविले ते वाया जाईल, अशी चिंता व्यक्त केली जाते. त्या पार्श्‍वभूमीवर, भारताकडून अफगाणी जनतेला आश्‍वस्त केले जात आहे.

अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानाचा ताबा तालिबानकडे जाईल, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे अफगाणिस्तानची लोकशाही, सामाजिक प्रगती हे सारे रसातळाला जाईल, अशी चिंता अफगाणी जनतेला वाटू लागली आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतरही आपले सरकार कोसणार नसल्याचा विश्‍वास व्यक्त केला आहे. पण अफगाणिस्तानात संघर्ष पेटलाच तर तालिबानपासून असलेला धोका अधिकच बळावेल, अशी दाट शक्यता समोर येत आहे. अशा परिस्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची बनली आहे.

भारताने अफगाणिस्तानात दोन अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली असून भारताच्या सहकार्यामुळे अफगाणिस्तानात विकास प्रकल्प उभे राहिले आहेत. यामुळे अफगाणी जनतेच्या भारताकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारतीय विद्यापीठांमध्ये अफगाणी तरुण शिक्षण घेत असून पुढच्या काळात दोन्ही देशांचे संबंध यामुळे अधिकच दृढ बनतील, असे संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्याची माघार हा या देशासाठी निर्णायक टप्पा ठरणार असल्याचा दावा केला जातो.

अशा अवघड परिस्थितीत भारत अफगाणी जनतेच्या बाजूने उभा राहिल, असा संदेश भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. अमेरिका अफगाणिस्तान सोडण्याची तयारी करीत असताना, ज्या तालिबानच्या हाती अफगाणिस्तानची सत्ता येण्याची शक्यता आहे, त्या तालिबानशी भारत वाटाघाटी करणार का? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. भारताची बांधिलकी अफगाणी जनतेशी असेल असे संकेत देऊन भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अफगाणी जनतेच्या हिताला भारत सर्वाधिक प्राधान्य देणार असल्याचा संदेश दिला आहे.

एकाच दिवसापूर्वी नवी दिल्लीतील रायसेना डायलॉगमध्ये बोलताना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अफगाणिस्तानमध्ये व अफगाणिस्तानच्या सभोवती असलेल्या देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची आवश्यकता असल्याचे बजावले होते. तसे झाल्याखेरीज अफगाणिस्तानची समस्या सुटणार नाही, असा दावा जयशंकर यांनी केला होता. पाकिस्तानच्या विघातक धोरणांमुळेच अफगाणिस्तानात अराजक माजलेले आहे, असा संदेश याद्वारे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला होता.

अमेरिकन सिनेटच्या ‘आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी’चे प्रमुख सिनेटर जॅक रिड यांनीही अफगाणिस्तानात तालिबानला मिळालेल्या यशाला पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानातल्या सुरक्षित आश्रयस्थानामुळेच तालिबानला अफगाणिस्तानात हिंसक कारवाया करता आल्या, अशी जळजळीत टीका रिड यांनी केली. त्याचवेळी अमेरिकेने पाकिस्तानातल्या तालिबानच्या या आश्रयस्थानांवर कारवाई केली नाही, अशी खंत देखील रिड यांनी व्यक्त केली. अंतर्गत समस्या, अफगाणिस्तानातील परिस्थिती, इराक युद्ध यामध्ये गुंतलेल्या अमेरिकेच्या आधीच्या प्रशासनांचे पाकिस्तानकडे दुर्लक्ष झाले, असे जॅक रिड यांनी म्हटले होते.

leave a reply