भारत स्वतंत्रपणे, शांततेच्या बाजूने उभा आहे

- अमेरिका व रशियाला भारताचा संदेश

वॉशिंग्टन/मॉस्को/संयुक्त राष्ट्रसंघ – भारताकडे आलेल्या जी२०च्या अध्यक्षपदाकडे अमेरिका आशावादी दृष्टीकोनातून पाहत आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. त्याचवेळी भारत अमेरिकेचा भक्कम भागीदार देश असल्याचा निर्वाळाही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारताला असा संदेश दिला जात असतानाच, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताला सावधानतेचा इशारा दिला. रशिया तसेच चीनच्या विरोधातील आघाडीत भारताला खेचण्याचे प्रयत्न नाटोकडून केले जात आहेत, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी बजावले. त्यावर प्रतिक्रिया देताना संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या राजदूतांनी प्रतिक्रिया दिली. भारत आपल्या पायावर ठामपणे उभा राहणारा व जगाकडे ताठ मानेने पाहणारा देश असून भारताचे परराष्ट्र धोरण शांततेच्या बाजूचे आहे, असे राजदूत रुचिरा कंबोज यांनी म्हटले आहे.

१ डिसेंबरपासून भारताकडे जी२०चे अध्यक्षपद आले आहे. हे अध्यक्षपद स्वीकारीत असताना, भारताने आपले धोरण सुस्पष्ट केले होते. युद्धाने नाही तर राजनैतिक वाटाघाटींनेच युक्रेनची समस्या सुटेल, असे भारताने रशिया व युक्रेनलाही बजावले आहे. भारताकडून करण्यात येत असलेल्या या विधानांना रशियाच्या विरोधातील पाश्चिमात्य माध्यमे निराळाच रंग देत आहेत. भारताने युक्रेनचे युद्ध छेडणाऱ्या रशियाच्या विरोधात विधाने केल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमांकडून केला जातो. अमेरिकेकडूनही तसेच सूर लावण्यात येत आहेत. त्यातच भारताकडे आलेल्या जी२०च्या अध्यक्षपदाचा दाखला देऊन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी याकडे आपण आशावादी दृष्टीकोनातून पाहत असल्याचा दावा केला. तसेच भारत हा अमेरिकेचा भक्कम भागीदार देश असल्याचा दावाही बायडेन यांनी केला आहे. तर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मात्र भारताला सावधानतेचा इशारा दिला.

थेट अमेरिकेवर आरोप न करता, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी नाटो भारताला रशिया आणि चीनच्या विरोधातील आघाडीत खेचण्याचा प्रयत्न करीत असल्याचा ठपका ठेवला. नाटोने जसे युक्रेनमध्ये युद्ध पेटविले, त्यात धर्तीवर साऊथ चायना सी क्षेत्रात चीनच्या विरोधात असंतोष माजवून युद्ध भडकावण्याचा प्रयत्न नाटो करीत आहे, असा दावा रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. चीनच्या सागरी क्षेत्रातील युद्धाचे परिणाम रशियाच्या किनाऱ्यापर्यंत येऊन ठेपतील. म्हणूनच रशिया चीनबरोबरील आपले लष्करी सहकार्य अधिकाधिक प्रमाणात वाढवित आहे.

चीनला कमकुवत करून रशियाला आव्हान देण्याचा नाटोचा डाव आहे, असे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह पुढे म्हणाले. रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिका व नाटोवर अशा स्वरूपाचे आरोप याआधीही केले होते. पण रशिया व चीनच्या विरोधातील लष्करी आघाडीत भारताला खेचण्याचे प्रयत्न नाटोकडून सुरू असल्याचा दावा करून परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. युक्रेनच्या युद्धात भारताने अमेरिकेचा दबाव झुगारून तटस्थ भूमिका स्वीकारली होती. पण भारताचा हा तटस्थपणा म्हणजेच रशियाची बाजू घेण्यासारखे ठरते, अशी टीका पाश्चिमात्य देशांनी केली होती. तसेच भारत रशियाकडून खरेदी करीत असलेल्या इंधनाचा मुद्दाही अमेरिका व युरोपिय देशांनी उपस्थित केला होता. त्याला दाद न देता भारताने रशियाबरोबरील सहकार्य कायम ठेवून रशियाकडून इंधनाच्या खरेदीत वाढ केली. त्याचवेळी रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला थेट पाठिंबा न देता भारताने राजनैतिक वाटाघाटींच्या मार्गाने ही समस्या सोडविण्याचा सल्ला रशियाला दिला होता.

संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या राजदूत रुचिरा कंबोज यांनी याची आठवण करून देऊन युक्रेनच्या युद्धाबाबत भारताची भूमिका सातत्यपूर्ण असल्याची जाणीव करून दिली. युक्रेनच्या युद्धात भारत शांततेच्या बाजूने आहे आणि ही देखील एक बाजूच ठरते, अशा शब्दात भारताच्या टीकाकारांना उत्तर दिले. त्याचवेळी रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी भारताबाबत केलेल्या विधानांवरही राजदूत रुचिरा कंबोज यांनी नेमक्या शब्दात देशाची भूमिका मांडली. भारत हा आपल्या पायावर ठामपणे व ताठ मानेने जगासमोर उभा राहणारा देश आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणावर दुसऱ्या देशाच्या दडपणाचा परिणाम होत नाही, याची जाणीव राजदूत कंबोज यांनी करून दिली. भारताची रशियाबरोबर अत्यंत महत्त्वाचे संबंध आहेत, तर भारताचे अमेरिकेबरोबर धोरणात्मक सहकार्य असून आधी कधीही नव्हते, इतक्या प्रमाणात भारत व अमेरिकेचे सहकार्य वाढत चालले आहे, असे सांगून राजदूत कंबोज यांनी दोन्ही देशांबरोबरील भारताचे संबंध स्वतंत्र असल्याचे बजावले आहे.

leave a reply