या वर्षात भारताचा रेमिटन्स १०० अब्ज डॉलर्सवर जाईल

- जागतिक बँकेचा अहवाल

नवी दिल्ली – परदेशात काम करणाऱ्या भारतीयांकडून मायदेशी पाठविला जाणारा निधी अर्थात रेमिटन्सेस यावर्षी १०० अब्ज डॉलर्सवर असेल. जागतिक बँकेने ही माहिती दिली. २०२१ साली ही रेमिटन्सची रक्कम ८९.४ अब्ज डॉलर्स इतकी होती. यावर्षी त्यात १२ टक्क्यांची वाढ झाली असून यामुळे पुन्हा एकदा भारत सर्वाधिक प्रमाणात रेमिटन्स येणारा देश बनला आहे. या यादीत भारतानंतर मेक्सिको, चीन व फिलिपाईन्स या देशांचा समावेश असल्याची माहिती जागितक बँकेने दिली.

अमेरिका व इतर श्रीमंत देशांमध्ये वेतनात झालेल्या वाढीमुळे भारताच्या रेमिटन्समध्ये ही वाढ झाल्याचा दावा जागतिक बँकेने केला आहे. याबरोबरच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य घसरल्याने, याचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी भारतीय मोठ्या प्रमाणात मायदेशी डॉलर पाठवित असल्याचाही दावा केला जातो. दरम्यान, भारताची जनसंख्या व या जनसंख्येतील तरुणांचे वाढत चाललेले प्रमाण लक्षात घेता, पुढच्या काळातही भारत रेमिटन्सच्या आघाडीवर आपले अव्वल स्थान कायम ठेवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर सारख्या देशांमध्ये उच्च दर्जाचे कौशल्य संपादन केलेला भारतीय तरूण वर्ग काम करीत आहे. या तरुणांकडून भारताला मोठ्या प्रमाणात रेमिटन्स मिळत आहे. पुढच्या काळात यात अधिकाधिक वाढ व्हावी, यासाठी भारत सरकार योजनाबद्ध प्रयत्न करीत असल्याचा दावा केला जातो. जागतिक पातळीवर सर्वाधिक प्रमाणात कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्याची क्षमता भारताकडे आहे. याचा वापर करून भारत ‘इंटरनॅशनल लेबर मार्केट’मध्ये आपला दबदबा कायम ठेवणार असल्याचे दिसत आहे. जागतिक बँकेच्या अहवालातून याचे संकेत मिळत आहेत.

भारताचे शेजारी देश असलेल्या पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका यांच्या रेमिटन्सद्वारे होणाऱ्या उत्पन्नात घट होणार असल्याची नोंद जागतिक बँकेच्या अहवालात करण्यात आली आहे. यामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या तिन्ही देशांना या घटलेल्या रेमिटन्सचा फटका बसू शकतो.

leave a reply