भारताची युरोपिय महासंघाशी धोरणात्मक चर्चा

ब्रुसेल्स – परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाचे मंत्री राजीव चंद्रशेखर व व्यापारमंत्री पियूष गोयल बेल्जियमच्या ब्रुसेल्समध्ये असून त्यांची युरोपिय महासंघाबरोबर चर्चा पार पडली. इंडिया ईयु ट्रेड अँड टेक्नॉलॉजी काऊन्सिल-टीटीसीच्या बैठकीत भारताचे मंत्री सहभागी झाले होते. भारत व युरोपिय महासंघात अशारितीने मंत्रीस्तरावर झालेली ही पहिलीच चर्चा असल्याचे सांगितले जाते. या दम्यान बोलताना भारत व युरोपिय महासंघाचे मुक्त व्यापारी करारावरील चर्चेला गती देण्यावर एकमत झाल्याचे व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे.

भारताची युरोपिय महासंघाशी धोरणात्मक चर्चागेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात युरोपिय महासंघाच्या अध्यक्षा उर्सूला व्हॉन डेर लेयन भारताच्या भेटीवर आल्या होत्या. पंतप्रधान मोदी व लेयन यांच्या उपस्थितीत टीटीसीची स्थापना करण्यात आली होती. याच्या अंतर्गत भारत व महासंघातील सहकार्यासाठी तीन कार्यकारी गटांची स्थापना करण्यात आली. धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे ठरणाऱ्या तंत्रज्ञान अर्थात डिजिटल गव्हर्नन्स व डिजिटल कनेक्टिव्हिटी या क्षेत्रातील भारत व महासंघाच्या सहकार्यावर यातील पहिला गट काम करणार होता. तर दुसरा कार्यकारी गट स्वच्छ ऊर्जा तसेच ग्रीन टेक्नॉलॉजीवरील सहकार्याला चालना देण्याचे कार्य करणार असल्याचे सांगण्यात आले होते. तिसऱ्या कार्यकारी गटावर व्यापार, गुंतवणूक तसेच पुरवठा साखळीसंदर्भातील भारत व युरोपिय महासंघाचे सहकार्य वाढविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

या साऱ्या कार्यकारी गटांची बैठक ब्रुसेल्स येथे पार पडली. यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाचे मंत्री राजीव चंद्रशेखर व व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी सहभाग घेतला. नव-जागतिकीकरणाच्या विश्वासार्ह प्रक्रियेला टीटीसी चालना देईल, असा विश्वास यावेळी जयशंकर यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी युरोपिय महासंघाबरोबर, टीटीसी, जी२० तसेच ग्लोबल साऊथ, युक्रेन आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर चर्चा पार पडल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.

तर युरोपिय महासंघाबरोबरील भारताच्या मुक्त व्यापारी करारावरील वाटाघाटींना गती देण्यावर इथे एकमत झाल्याचे व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे. युरोपिय महासंघाचे चीनबरोबरील मतभेद तीव्र झाल्यानंतर महासंघाने भारताबरोबरील आपले व्यापारी सहकार्य वाढविण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच युरोपिय महासंघ जागतिक व्यापारी वाहतूक व सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपली गुंतवणूक व प्रभाव वाढविण्यासाठी उत्सुक आहे. त्यासाठी महासंघाला भारताचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे वाटत असल्याचे संकेत मिळत आहेत.

मात्र असे असले तरी भारत व युरोपिय महासंघामधील सहकार्यात बाधा आणणारे मुद्दे सातत्याने समोर येत आहेत. भारताचे रशियाबरोबरील सहकार्य युरोपिय देशांना खटकणारी बाब ठरते. युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरण विभागाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील बैठकीआधी लक्ष वेधून घेणारे विधान केले होतो. रशियाकडून भारत खरेदी करीत असलेल्या इंधनावर तयार झालेल्या उत्पादनांना युरोपिय देशांमध्ये प्रवेश मिळता कामा नये, असे बोरेल यांनी म्हटले आहे.

हिंदी

 

leave a reply