भारताचे सामर्थ्य ही जगाचे संतुलन राखणारी शक्ती

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताचे सामर्थ्यकारगिल – भारताची परंपरा युद्ध हा अखेरचा पर्याय ठरतो, यावर विश्वास ठेवणारी आहे. लंका असो व कुरूक्षेत्र, अखेरपर्यंत युद्ध टाळण्याचे सारे प्रयत्न करण्यात आले. म्हणूनच आपण सारे विश्वशांतीचे पुरस्कर्ते व युद्धविरोधी आहोत. पण सामर्थ्याखेरीज शांती संभवत नाही. भारतीय संरक्षणदलांकडे सामर्थ्य आणि रणनीति देखील आहे. कुणी भारताकडे वाकड्या नजरेने पाहिलेच, तर देशाच्या तिन्ही संरक्षणदलांना शत्रूला त्याच भाषेत उत्तर कसे द्यायचे, ते पूर्णपणे ठाऊक आहे’, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षणदलांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला. कारगिलमध्ये सैनिकांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी हा विश्वास व्यक्त केला. तसे भारत ही जगाचे संतुलन राखणारी शक्ती असल्याचे सांगून भारताचे सामर्थ्य वाढल्यानंतर शांती प्रस्थापित होण्याची शक्यताही त्याच प्रमाणात वाढते, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

गेल्या सात वर्षांपासून पंतप्रधान सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. यावेळी त्यांनी कारगिलमध्ये तैनात असलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. तुमची आणि सर्वसामान्य नागरिक साजरी करतात, ती दिवाळी अतिशय वेगळी असते. कारण तुमची आतषबाजी आणि धमाके अगदी निराळे असतात, असे पंतप्रधान सैनिकांना म्हणाले. आंतकाच्या अंताचा जल्लोष म्हणजे दिवाळी असे सांगून पंतप्रधानांनी १९९९ सालच्या कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला खडे चारले होते, याची आठवण करून दिली. कारगिलमधील युद्धाच्या विजयाची दिवाळीच देशात अशी काही साजरी झाली की त्याची आठवण आजही काढली जाते, असे पंतप्रधान म्हणाले.

ज्या राष्ट्राची आपण आराधना करतो, तो भारत केवळ भूखंड नाही तर जिवंत विभूती आहे, चिरंतन चेतना आणि अमर अस्तित्त्व आहे. भारत म्हणजे शाश्वत संस्कृती, पराक्रमाचा वारसा यांची गंगनचुंबी हिमालयापासून निघणारी व हिंदी महासागरात सामावणारी अजस्त्र धारा आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी भारताच्या महिमेचे वर्णन केले. अशा देशाच्या संरक्षणासाठी आज संरक्षणदलांकडे स्वदेशी बनावटीची शस्त्रे आहेत. संरक्षणक्षेत्रात देश आत्मनिर्भर बनत आहे. ४००हून अधिक शस्त्रे आता देशातच तयार होऊ लागली आहेत, याकडे लक्ष वेधून पंतप्रधानांनी त्यावर समाधान व्यक्त केले. ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र, प्रचंड लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, तेजस लढाऊ विमान, विमानवाहू युद्धनौका विक्रांत, अरिहंत पाणबुडी, पृथ्वी व आकाश ही क्षेपणास्त्रे आणि पिनाका रॉकेट लाँचर, अर्जुन रणगाडा, हे सारे काही देशातच तयार होत आहे, याचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला.

आज भारत आपली क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा भक्कम करीत आहे व त्याबरोबर ड्रोनसारख्या आधुनिक आणि प्र्रभावी तंत्रज्ञानावर भारत वेगाने काम करीत आहे, याचीही जाणीव पंतप्रधानांनी करून दिली. मात्र भारताचे हे सामर्थ्य युद्धखोरीसाठी नसून अंतिम पर्याय म्हणूनच भारत युद्धाकडे पाहतो, हे देखील पंतप्रधानांनी थेट शब्दात मांडले. भारताचे वाढते सामर्थ्य म्हणजे जगात संतुलन राखणारी शक्ती असून यामुळे शांती प्रस्थापित होण्याची शक्यता अधिकच वाढते, अशा शब्दात पंतप्रधानांनी देशाचे धोरण स्पष्ट केले. त्याचवेळी बाह्य शत्रूंबरोबरच अंतर्गत आव्हानांचा देश सामना करीत आहे. दहशतवाद, नक्षलवाद आणि भ्रष्टाचाराशाही देशाचा यशस्वी संघर्ष सुरू असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

leave a reply