रशिया व अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांची फोनवरून चर्चा

फोनवरून चर्चामॉस्को/वॉशिंग्टन – रविवारी रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. गेल्या तीन दिवसांमध्ये रशियन संरक्षणमंत्र्यांनी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांशी दुसऱ्यांदा चर्चा केली आहे. युक्रेनमधील संघर्षावरून रशिया व अमेरिकेतील संबंध टोकाला गेल्याचे संकेत मिळत आहेत. अशा वेळी दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये एकापाठोपाठ चर्चा होणे लक्ष वेधून घेणारे ठरते. दरम्यान, रशिया-अमेरिकेच्या मंत्र्यांमधील चर्चेच्या पार्श्वभूमीवर, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य केले आहे.

गेल्याच आठवड्यात शुक्रवारी रशिया व अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांदरम्यान फोनवरून संभाषण झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली होती. या चर्चेत युक्रेनमधील संघर्षाचा मुद्दाही होता, असे रशियाकडून सांगण्यात आले होते. मात्र रविवारी झालेल्या संभाषणाबद्दल, युक्रेनमधील स्थितीबाबत बोलणी झाली याव्यतिरिक्त कोणतीही माहिती रशियाने दिलेली नाही. अमेरिकेकडून देण्यात आलेल्या निवेदनात ‘डर्टी बॉम्ब’संदर्भातील आरोप नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेव्यतिरिक्त फ्रान्स, ब्रिटन व तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांबरोबरही चर्चा करण्यात आली, असे रशियाने स्पष्ट केले. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर संरक्षणमंत्री शोईगू यांनी एकाच दिवसात चार देशांच्या संरक्षणमंत्र्यांबरोबर संवाद साधण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.

फोनवरून चर्चादरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी रशिया-युक्रेन युद्धात शांतता निर्माण होण्याची शक्यता अजूनही आहे, असे वक्तव्य केले. रविवारी रोममध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मॅक्रॉन यांनी, युक्रेनचे नेते व जनता यासंदर्भात निर्णय घेईल, असे सांगितले. रशियाबरोबरील शांतीकराराबाबतचे अधिकार युक्रेनकडेच असतील, असा दावाही फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी यावेळी केला. रशिया-युक्रेन संघर्षाला सुरुवात होण्यापूर्वी तसेच त्यानंतरही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी शांतीचर्चेसाठी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांवर युक्रेनसह काही युरोपिय देशांनी टीकास्त्रही सोडले होते. मात्र फ्रान्स शांततेसाठी सुरू असलेले प्रयत्न सोडणार नसल्याचे मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले होते.

पुढील काही दिवसात पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला होणारा शस्त्रपुरवठा अडचणीत येईल, असे संकेत मिळत आहेत. त्याचवेळी रशियाकडून युक्रेनवर सुरू असणाऱ्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील जनतेत नाराजी निर्माण झाल्याचेही सांगण्यात येते. युक्रेनी जनता व लष्कर हिवाळ्यात रशियाविरोधात तग धरु शकणार नाही, असे दावेही माध्यमांमधून समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या विधानांचे महत्त्व वाढले आहे.

leave a reply