रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करणारा भारत युरोपिय देशांना इंधनाचा पुरवठा करीत आहे

- इंधनव्यवहारांची माहिती देणाऱ्या कंपनीचा दावा

नवी दिल्ली – भारत प्रक्रिया केलेल्या इंधनाची युरोपिय देशांना करीत असलेली निर्यात प्रतिदिनी ३,६०,००० बॅरल्सवर गेली आहे. यामुळे युरोपिय देशांना इंधनाचा पुरवठा करणाऱ्या सौदी अरेबियालाही भारताने मागे टाकल्याचे दिसते. इंधनव्यवहारांची नोंद करणाऱ्या ‘केपलर डाटा’ने ही माहिती दिली. त्याचवेळी एप्रिल महिन्यात रशिया भारताला करीत असलेली इंधनतेलाची निर्यात दिवसाकाठी २० लाख बॅरल्सवर गेल्याचेही ‘केपलर डाटा’ने म्हटले आहे. रशिया, सौदी अरेबिया आणि इराक हे भारताला इंधनाचा पुरवठा करणारे पहिल्या तीन क्रमांकाचे देश असल्याची माहिती या कंपनीने दिली.

इंधनाचा पुरवठायुक्रेनच्या युद्धानंतर अमेरिका व युरोपिय देशांनी निर्बंध लादून रशियाची इंधन निर्यात रोखण्याचा प्रयत्न केला होता. भारताला सवलतीच्या दरात इंधनाचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव देऊन रशियाने या निर्बंधांना प्रत्युत्तर दिले. याचा पुरेपूर लाभ भारताने घेतला आणि रशियाकडून प्रचंड प्रमाणात इंधनाची खरेदी सुरू केली. यामुळे अल्पावधितच रशिया हा भारताला सर्वाधिक प्रमाणात कच्चे तेल पुरविणारा देश बनला आहे. एप्रिल महिन्यातच दरदिवशी रशिया भारताला सुमारे २० लाख बॅरल्स इतक्या इंधनतेलाचा पुरवठा करीत आहे. दोन्ही देशांमधला हा इंधनव्यवहार फेब्रुवारी महिन्यात तब्बल ३.३५ अब्ज डॉलर्सवर गेला होता, अशी माहिती ‘केपलर डाटा’ने दिली.

रशियाकडून इंधनतेल खरेदी करून भारत युरोपिय देशांना इंधनाचा पुरवठा करीत असल्याचे आरोप याआधी झाले होते. पाकिस्तानच्या पत्रकार व विश्लेषकांनी रशियाचे इंधनतेल भारतामार्फत युरोपिय देशांना पुरविले जात असल्याचा दावा केला होता. या इंधनव्यवहारात भारताने आत्तापर्यंत अब्जावधी डॉलर्सची कमाई केल्याचे पाकिस्तानी विश्लेषकांचे म्हणणे आहे. म्हणूनच पाकिस्तानने रशियाकडे आम्हालाही भारताप्रमाणे इंधनतेल पुरविण्याची मागणी केली होती. दरम्यान, भारताचे पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना, त्यांना देखील एका मुलाखतीत याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

भारत रशियाकडून इंधनतेल घेऊन, त्यावर प्रक्रिया करून त्याची अमेरिकेला विक्री करीत असल्याचा ठपका अमेरिकन पत्रकाराने ठेवला होता. त्याला उत्तर देताना हरदीपसिंग पुरी यांनी भारतीय सरकार असा व्यवहार करीत नाही, पण भारताच्या खाजगी क्षेत्रातील कंपन्या तसे करीत असतील, असे म्हटले होते. अमेरिकेत झालेल्या या आरोपाच्या धर्तीवर केपलर डाटाने भारताच्या इंधन व्यवहाराबाबतची माहिती प्रसिद्ध केल्याचे दिसत आहे.

युक्रेनच्या युद्धानंतर युरोपिय देशांनी रशियाकडून इंधनाची खरेदी थांबविली होती. यासाठी अमेरिकेने युरोपिय देशांवर दडपण टाकले होते. यासाठी सौदी अरेबिया व इतर आखाती देशांकडून इंधनाची खरेदी करण्याची तयारी युरोपिय देशांनी केली. पण सौदी व इतर आखाती देशांनी रशियाची नाराजी पत्करून युरोपिय देशांना इंधनाचा अधिक पुरवठा करण्याचे नाकारले होते. त्यामुळे कोंडी झालेले युरोपिय देश भारतात प्रक्रिया झालेले इंधनतेल खरेदी करून आपली गरज पूर्ण करीत आहेत. पण युरोपिय देश भारताकडून प्रतिदिनी तीन लाख, साठ हजार बॅरल्स इतके इंधनतेल खरेदी करीत असताना, भारत रशियाकडून दरदिवशी वीस लाख बॅरल्स इतके इंधनतेल खरेदी करीत असल्याची बाब केपलर डाटाने लक्षात आणून दिली. यामुळे अप्रत्यक्षरित्या युरोपिय देश अजूनही इंधनासाठी रशियावर अवलंबून आहेत, हे यातून स्पष्ट होत आहे.

युक्रेनचे युद्ध इतक्यात संपण्याची शक्यता नसल्याने, युरोपिय देशांना पुढच्या काळातही भारताकडून प्रक्रिया केलेले इंधनतेल खरेदी करावे लागणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. भारतीय इंधनकंपन्यांना याचा लाभ मिळू शकतो.

leave a reply