चीनच्या कुरापतखोर कारवायांमुळेच भारताने ‘एससीओ’दरम्यान कठोर भूमिका स्वीकारली

- भारतीय माध्यमे आणि विश्लेषकांचे संकेत

नवी दिल्ली – शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओच्या बैठकीदरम्यान भारताने एलएसीवरील तणावाचा मुद्दा उपस्थित करून चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याची टीका या देशाच्या सरकारी मुखपत्राने केली होती. विशेषतः चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू यांच्याबरोबरील द्विपक्षीय चर्चेत भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी त्यांना खडे बोल सुनावल्याचे चीनच्या ग्लोबल टाईम्सने म्हटले होते. मात्र भारताच्या या आक्रमक भूमिकेला चीनच्या कारवाया जबाबदार असल्याची बाब समोर येत आहे. भारताला वगळून चीन थेट भूतानशी चर्चा करण्याच्या तयारीत आहे. त्याचवेळी भारतीय लष्कराने अमेरिकन लष्करासोबत चीनच्या सीमेजवळ केलेल्या युद्धसरावानंतर, भारताविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्याची तयारी चीनने केली आहे. याची जाणीव झाल्यामुळेच भारताने एससीओच्या बैठकीदरम्यान चीनच्या विरोधात आक्रमक धोरण स्वीकारल्याचे संकेत मिळत आहेत.

‘एससीओ’संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या चीनच्या संरक्षणमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेबाबत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले होते. एलएसीवर शांती व सौहार्द प्रस्थापित झाल्याखेरीज दोन्ही देशांमधील तणाव निवळणार नाही, असे संरक्षणमंत्र्यांनी चीनला बजावल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले होते. याची भाषा अतिशय कठोर व आक्रमक असल्याची टीका चीनच्या विश्लेषकांनी केली होती. यानंतर लॅटिन अमेरिकन देशांच्या दौऱ्यावर असलेल्या भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी देखील भारत व चीनचे संबंध तणावपूर्ण असल्याचे म्हटले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व त्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या या विधानांमुळे भारत चीनवरील राजनैतिक दडपण अधिकच वाढवित असल्याचे दिसते.

भारताने स्वीकारलेल्या या कठोर भूमिकेला पार्श्वभूमी लाभलेली आहे. भारत व अमेरिकन लष्कराचा युद्धसराव नुकताच पार पडला होता. पहाडी व दुर्गम क्षेत्रातील युद्धात भारतीय लष्कर सर्वोत्तम असल्याचे बोलले जाते. गलवानच्या संघर्षानंतर खुद्द चीनच्या लष्करी विश्लेषकांनी देखील ही बाब मान्य केली होती. अशा परिस्थितीत अमेरिकन लष्कर भारताबरोबर पहाडी व दुर्गम भागातील युद्धतंत्राचा अभ्यास करून याचा अनुभव घेत आहे, ही चीनसाठी अत्यंत घातक बाब ठरते, असे चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू यांनी म्हटले होते. इतकेच नाही तर याविरोधात चीन पावले उचलल्यावाचून राहणार नाही, असे दावे या देशाकडून करण्यात आले होते.

अमेरिकेबरोबरील आपल्या युद्धसरावावरील चीनच्या आक्षेपाला उत्तर देताना, सदर युद्धसराव नियमांच्या चौकटीत असल्याचा खुलासा भारताने केला होता. याआधी पाकिस्तानसारख्या भारतद्वेष्ट्या देशाबरोबर चीनने भारताच्या सुरक्षेला आव्हान देणारे कितीतरी सराव केले होते. ते लक्षात घेता भारताने अमेरिकन लष्कराबरोबर केलेल्या सरावावर आक्षेप घेण्याचा अधिकार चीनला नाही. तरीही यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने या सरावानंतर भूतानबरोबरील भारताच्या सीमेवर हालचाली सुरू करून भूतानशी थेट चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नाही तर अरुणाचल प्रदेशमधील ठिकाणांची नावे बदलून चीनने भारताला चिथावणी दिली होती. एससीओच्या बैठकीदरम्यान यावर भारताकडून प्रतिक्रिया उमटल्याचे दिसत आहे. चीनने अशा कारवाया सुरू ठेवल्या, तर भारताची भूमिका अधिकच कठोर होऊ शकते, याची जाणीव याद्वारे चीनला करून दिली जात आहे.

leave a reply