भारत दक्षिण कोरियातून ५ लाख टेस्टिंग किट्स खरेदी करणार

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) –  देशात कोरोनाव्हायरसच्या  टेस्टिंग किट्सची  कमतरता भासू नये यासाठी  केंद्र सरकार दक्षिण कोरियाकडून ५ लाख  टेस्टिंग किट्स  खरेदी करणार आहे.  लवकरच हे किट्स  भारताला मिळतील, असे अधिकाऱ्यांनी म्हटले.

दक्षिण कोरियाकडून टेस्टिंग किट्स  खरेदी करण्यासाठी हुमसिस लिमिटेड या कंपनीबरोबर चर्चा करण्यात येत होती. सेऊल येथील भारतीय दूतावासाने नुकताच या कंपनीबरोबर  करार केला आहे. तर टेस्टिंग किट्सच्या उत्पादनासाठी ही कंपनी भारताकडून कच्चा माल  खरेदी करणार आहे. चार टप्प्यात  या किट्स  पाठवण्यात येणार आहेत. ३० एप्रिलपासून  या किट्स पाठवण्यास सुरवात करण्यात येणार असल्याची  माहिती भारतीय राजदूत श्रीप्रिया रंगनाथन यांनी दिली.  कोरियन कंपनीचे किट्स  अधिक प्रभावी ठरत असल्याने जगातील सुमारे १२१ देशानी कोरियाकडे किट्सची मागणी  केली आहे. 

गेल्याच आठवड्यात चीनकडून  भारताला ६.५ लाख किट्स  मिळाले  आहेत. मात्र देशातील कोरोनाव्हायरसच्या संख्येत वाढ होत असल्याने  टेस्टिंग किट्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. त्यासाठीच दक्षिण कोरियाकडून टेस्टिंग किट्स  खरेदी  करण्यात येत आहेत.

मागील काही आठवड्यात केंद्र व राज्य सरकार आणि खाजगी कंपन्यांनी दक्षिण  कोरियाकडून ४.५ लाख किट्स (आरटी-पीसीआर ) खरेदी केल्या आहेत. तर आता दक्षिण कोरियाच्या डायग्नोस्टिक किट्सचे   उत्पादन करणाऱ्या एस.डी. बायोसेन्सरने कंपनीने  हरियाणाच्या मानसेर येथे ” कोविद १९ ‘ टेस्टिंग किट्स  उत्पादनास सुरुवात केली आहे. कंपनीकडून  दर आठवड्याला ५  लाख किट्सचे उत्पादन या ठिकाणी करण्यात येणार आहे. या किटमुळे तपासणी  करण्यात येणाऱ्या व्यक्तीमध्ये “अँटीबॉडीज तयार होत आहेत का याची  माहिती मिळते. या चाचण्यांचा निकाल  सुमारे अर्धा तासात  उपलब्ध होतो.  त्यामुळे डॉक्टर आणि आरोग्यसेवा कर्मचारी संक्रमित झालेल्या नागरिकांची संख्या निश्चित करू शकतील.

नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील भारताच्या तुलनेत अमेरिकेत अधिक चाचण्या होत असल्याचे म्हटले होते.  अमेरिकेत सुमारे ४१ लाख  नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर भारतात आतापर्यंत सुमारे चार लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत.  कोरियन कंपनीकडून किट्स आयात करण्यात येणार असल्याने कोरोनाची चाचणी करण्याचा वेग वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 

leave a reply