भारत ‘एलएसी’वर ३५ हजार अतिरिक्त सैनिक तैनात करणार

नवी दिल्ली – चीन पॅंगोन्ग त्सो सरोवराच्या भागातून मागे हटण्यास तयार नाही. लडाखमधील ‘एलएसी’पासून जवळ असलेल्या ‘डेप्सांग’ भागात चीनच्या लष्कराने जमवाजमव सुरु केल्याचे उघड होत आहे. ‘अक्साई चीन’ च्या भागात सुमारे ५० हजार सैनिक आणि क्षेपणास्त्र तैनाती केल्याच्या बातम्या आल्या होत्या. चीनच्या या तयारीतून लडाखमध्ये चीन भारताबरोबर दिर्घ संघर्षांची तयारी करीत असल्याचे दावे केले जात असताना भारताने चीनच्या कोणत्याही आगळिकीला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. भारत ‘एलएसी’वर ३५ हजार अतिरिक्त सौनिकांची तैनाती करणार असल्याचे वृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने समोर येत आहे.

‘एलएसी’च्या बहुतांश भागातून आपले जवान ठरल्याप्रमाणे मागे हटल्याचा आणि या भागातील तणाव कमी झाला असल्याचा दावा चीनकडून केला जात आहे. मात्र चीनचा हा दावा भारताकडून सपशेल फेटाळून लावण्यात आला आहे. पॅंगोन्ग त्सो सरोवराच्या फिंगर ४ आणि फिंगर ८ मध्ये चीनचे जवान मागे गेलेले नाहीत. ‘एलएसी‘वर ‘डेप्सांग’ भागात चीन मोठ्या प्रमाणावर लष्करी जमवाजमव करीत आहेत. येथे नवे तंबू, बंकर्स उभारले जात आहे. ‘एमिसॅट’ या भारताच्या उपग्रहाच्या टेहळणीतून नुकतेच ही बाब उघड झाली होती. तर ‘अक्साई चीन’ भागातील छायाचित्रही आता प्रसिद्ध झाली आहेत.

यानुसार ‘अक्साई चीन’च्या सैतुला येथील आपल्या लष्करी तळाला चीनने आधुनिक बनविले आहे. गेल्या दोन वर्षांपासून चीन ही तयारी करीत होता. चीनने या तळावर घातक शस्त्रास्त्र तैनात केल्याचे दावे, आणि सैनिकांच्या दीर्घ तैनातीसाठी सुविधा निर्माण केल्याचा दावा या छायाचित्रांच्या विश्लेषणातून केला गेला आहे. ‘अक्साई चीन’ मध्ये सुमारे ५० हजार सैनिक चीनने तैनात केल्याच्या बातम्या आल्या होत्या.

India-LAC-Chinaयापार्श्वभूमीवर भारतानेही चीनच्या कोणत्याही कुरापतींना जबरदस्त प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. लष्कराने आधिच ‘एलएसी’वर पर्वतीय क्षेत्रांमधील युद्धतंत्रात प्रवीण असलेल्या माऊंटन ब्रिगेडच्या जवानांची तैनाती वाढविली होती. तसेच टी-९० रणगाडे, हॉवित्झर तोफा, रडार यंत्रणा चीन सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. आता आणखी ३५ हजार जवान ‘एलएसी’ वर तैनात केली जात असल्याचे वृत्त आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती जाहीर केल्याचा दावा वृत्तामधून करण्यात आला आहे.

केवळ लडाख नाही, चीन सीमेला लागून असलेल्या ईशान्य भारतामधील सर्वच सीमाभागात तैनाती वाढविण्यात येत आहे. लडाख, सियाचिन आणि ईशान्य भारतातील अतिउंचीवरील भागात याआधी सेवा बजावलेल्या सैनिकांना चीन सीमेवर पुन्हा तैनात केले जात आहे. हे सैनिक या वातावरणाशी सरावलेले असल्याने त्यांचे शाररिक आणि मानसिक बल चिनी जवानांपेक्षा कितीतरी अधिक आहे. चिनी जवानांना येथील वातावरणाशी जुळवून घेण्यात अडचणी येत असल्याने या तैनातीमुळे भारत वरचढ ठरणार असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला. भारतीय सैनिक सियाचिनसारख्या जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमीवर सेवा बजावतात, ही गोष्ट या अधिकाऱ्याने अधोरेखित केली.

लडाखजवळ चीनच्या तैनातीची भारतीय लष्कर फारशी चिंता करीत नाही. कारण भारताने आधीच येथे सैन्य सज्जता वाढविली आहे. चीनने या भागात तैनात केलेल्या जवानांपेक्षा जास्त सैनिक भारताने तैनात केले आहेत, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली. पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात येणाऱ्या सैनिकांना येथील अतिथंड वातावरणात सेवा बजावण्यासाठी पोर्टेबल कॅबिनही पुरविल्या जाणार आहेत. तसेच लष्कराने केलेल्या मागणीनुसार अतिरिक्त तंबू पुरविले जात आहेत. तसेच येथे आवश्यक साहित्याचा साठा करण्यात आला आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

India-LAC-Chinaदरम्यान, चीनने लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीमागे अनेक कारणे होती. पीओके भारत ताब्यात घेईल, यामुळे आपला सीपीईसी प्रकल्प बारगळेल, अशी भीती चीनला सतावत होती. तसेच पुढे मागे भारत ‘अक्साई चीन’ ही ताब्यात घेईल, ही धास्ती चीनला आहे. कोरोनाच्या साथीनंतर जगभरात चीनविरोधातील वातावरण, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमधील वाढते क्वाड सहकार्य, चीनमधील अंतर्गत असंतोष, त्याचबरोबर भारत या भागात झपाट्याने विकसित करीत असलेल्या पायभूत सुविधा या कारणामुळे चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली. मात्र ती आता चीनच्या अंगलट आली आहे, असा दावा विश्लेषक करीत आहे.

गलवानमधील संघर्षात २० सैनिक शहिद झाल्यावर भारताने घेतलेला आक्रमक पवित्रा आणि भारताच्या भूमिकेला जगभरातून मिळणारे सहकार्य यामुळे चीन आता खूपच अस्वस्थ झाला आहे. आता हा चीनसाठी हा प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे. येथून माघार घ्यावी लागल्यास खूप नाच्चकी होईल याची जाणीव चीनला आहे. यामुळे चीन वेळकाढूपणा करीत असून सैन्य तैनाती वाढवून आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र जेवढ्या जास्त काळ चीन मागे हटणार नाही, तेवढी चीनला अधिक नाच्चकी सहन करावी लागेल, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply