भारत म्यानमारला ‘आयएनएस सिन्धुवीर’ पाणबुडी देणार

नवी दिल्ली – भारत म्यानमारच्या नौदलाला किलो श्रेणीतील ‘आयएनएस सिन्धुवीर’ ही पाणबुडी देणार आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली. नुकताच भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुंकूद नरवणे आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्यानमारचा दौरा केला होता. यानंतर झालेली ही घोषणा लक्ष वेधून घेणारी ठरते. चीनचा या क्षेत्रातला वाढता प्रभाव पाहता म्यानमारच्या नौदलाच्या ताफ्यात येणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे महत्त्व वाढले आहे.

'आयएनएस सिन्धुवीर'

भारतीय नौदलातील किलो श्रेणीतील ‘आयएनएस सिन्धुवीर’ ही डिझेल इलेक्ट्रिकवर चालणारी पाणबुडी रशियन बनावटीची आहे. विशाखापट्टणममधील ‘हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड’मध्ये या पाणबुडीमध्ये बदल करण्यात आले असून आता ती म्यानमारच्या नौदलाला सोपविली जाणार आहे. तसेच यासाठी भारताने म्यानमारच्या नौदलाच्या जवानांना प्रशिक्षण दिले आहे. गेले वर्षभर भारत ‘आयएनएस सिन्धुवीर’ म्यानमारला देणार असल्याची माध्यमांमध्ये चर्चा होती.

म्यानमारच्या नौदलातील ही पहिलीच पाणबुडी असणार आहे. भारत ‘मिशन सागर’ अंतर्गत शेजारी देशांना आत्मनिर्भर करीत आहे. यामुळे भारत आणि म्यानमारमधील सागरी सहकार्य वाढेल. भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ आणि ‘अँक्ट ईस्ट’ धोरणानुसार हे सहकार्य असल्याचे परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

'आयएनएस सिन्धुवीर'दरम्यान, लष्करप्रमुख नरवणे यांच्या म्यानमार भेटीत भारताने म्यानमारला लष्करी साहित्य देण्याची तयारी दाखविल्याचे वृत्त आहे. तसेच भारत म्यानमारच्या लष्कराला तोफा, ‘टी-७२’ रणगाड्यांसाठी दारूगोळा, रडार्स, सोनार यंत्रणा आणि ५०० बुलेट प्रुफ जॅकेटस् देणार आहे. म्यानमारवरील चीनचा प्रभाव कमी करणे, हा त्यामागचा हेतू असल्याचे सांगितले जाते.

मध्यंतरी चीन म्यानमारला जुन्या पाणबुड्या देणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण नंतरच्या काळात म्यानमारमधील अराकन दहशतवाद्यांना चीनकडून शस्त्रसाठा पुरविले जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चीन आणि म्यानमारच्या संबंधात कटुता निर्माण झाली होती. तसेच चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकू नये म्हणून म्यानमारने ‘चायना म्यानमार इकोनॉमिक कॉरिडार’ प्रकल्पातून माघारीचे संकेत दिले होते. यानंतर चीन आणि म्यानमारमधले संबंध आणखी बिघडले. या पार्श्वभूमीवर चीनला रोखण्यासाठी भारत आणि म्यानमारमधील हे वाढते सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.

leave a reply