इस्रायली लष्कराने सिरियाच्या हद्दीत घुसून कारवाई केली

जेरूसलेम – सिरियाने गोलान टेकड्यांच्या डिमिलिटराईज्ड्‍ झोनमध्ये उभारलेल्या दोन सुरक्षा चौक्या इस्रायली लष्कराने नष्ट केल्या आहेत. इस्रायली लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या जवानांनी सीमारेषा ओलांडून ही कामगिरी पार पाडली, अशी घोषणा इस्रायली लष्कराने केली. आवश्यकता भासल्यास इस्रायली लष्कर पुन्हा अशी कारवाई करील, असा इशारा इस्रायली लष्कराने दिला. ही कारवाई म्हणजे डिमिलिटराईज्ड्‍ झोनमध्ये सुरक्षा चौक्या तसेच सैन्याची तैनाती करणार्‍या सिरियातील अस्साद राजवटीसाठी संदेश होता, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

इस्रायली लष्कराने सिरियाच्या हद्दीत घुसून कारवाई केलीइस्रायली लष्करातील ‘नहाल ब्रिगेड’ आणि ‘यहालोम युनिट’च्या स्पेशल फोर्सेसच्या जवानांनी २१ सप्टेंबरच्या रात्री उत्तरी गोलान टेकड्यांची सीमारेषा ओलांडून ही कारवाई केली. सिरियन लष्कराने संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांचे उल्लंघन करुन या सीमाभागात उभारलेल्या सिरियन लष्कराच्या दोन चौक्या सलग कारवाईत नष्ट केल्या आणि इस्रायली जवान सुरक्षित आपल्या सीमाभागात परतले, अशी माहिती इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केली. सिरियन लष्कर या दोन्ही सुरक्षा चौक्यांचा वापर इस्रायलच्या गोलान टेकड्यांवरील हालचाली टिपण्यासाठी करीत असल्याचा आरोप इस्रायली लष्कराने केला. या कारवाईत सिरियन लष्कराची किती हानी झाली, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यांनी यासंबंधी माहिती उघड केल्यानंतर, नहाल ब्रिगेडच्या लष्करी अधिकार्‍यांनी या कारवाईची माहिती दिली. इराण तसेच लेबेनॉनमधील हिजबुल्लाहशी सहकार्य असणार्‍या सिरियाला गोलान टेकड्यांच्या सीमेवर रोखण्यासाठी यापुढेही इस्रायली लष्कराकडून अशी कारवाई केली जाईल, असा इशारा इस्रायली लष्कराने दिला. त्याचबरोबर दक्षिण सिरियाचे दक्षिण लेबेनॉन होऊ देणार नाही, असे सांगून सिरियाच्या दक्षिणेकडील भागात दहशतवादी संघटनांच्या वाढत्या हालचालींवर आपली नजर असल्याचे इस्रायली लष्कराने ठणकावले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांप्रमाणे, इस्रायल आणि सिरियाच्या डिमिलिटराईज्ड्‍ झोनमध्ये उभय देशांना किंवा संलग्न सशस्त्र गटांना कोणत्याही प्रकारची लष्करी हालचाल करण्यास स्पष्ट मनाई आहे. या सीमाभागात संयुक्त राष्ट्रसंघाचे शांतीसैनिक तैनात करण्याचे ठरलेले आहे. असे असताना, सिरियाने या भागात दोन सुरक्षा चौक्या उभारल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. त्याचबरोबर गेल्याच महिन्यात या भागातील सिरियन लष्कराबरोबरच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसचे जवान, इराणसंलग्न हिजबुल्लाह व इतर दहशतवादी संघटनांच्या हालचाली वाढल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तर सिरियन राष्ट्राध्यक्ष बाशर अल अस्साद यांनी देखील गोलान टेकड्या परत मिळविल्याशिवाय इस्रायलबरोबर चर्चा शक्य नसल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर, इस्रायली लष्कराने ही कारवाई करुन सिरियातील अस्साद राजवटीला इशारा दिल्याचा दावा केला जातो.

leave a reply