भारताचा लॅटिन अमेरिकन देशांबरोबरील व्यापार 50 अब्ज डॉलर्सवर

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

व्यापार 50 अब्जसँटो डॉमिंगो  – भारताचा लॅटिन अमेरिकन देशांबरोबरील व्यापार 50 अब्ज डॉलर्सच्या जवळ पोहोचला आहे. ब्राझिलबरोबरील भारताचा द्विपक्षीय व्यापार 6.48 अब्ज डॉलर्स इतका असून भारताच्या जपानबरोबरील द्विपक्षीय व्यापाराहून (6.18) अधिक आहे. मेक्सिकोबरोबरील भारताचा व्यापार 4.43 इतका असून हा भारताच्या कॅनडाबरोबरील व्यापाराहून (3.7) अधिक आहे. इतकेच नाही तर भारताने शनिवारी आपला दूतावास सुरू केला, त्या ज्या डॉमनिकन रिपब्लिकशी देखील भारताचा जवळपास 33 कोटी डॉलर्स इतका द्विपक्षीय व्यापार आहे. त्यामुळे लॅटिन अमेरिकन देश भारतापासून खूप दूर असल्याचा समज आता मागे पडलेला आहे, असे सांगून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी त्यावर समाधान व्यक्त केले.

डीपर ग्लोबलायझेशन अर्थात सखोल जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असून यानुसार भारत लॅटिन अमेरिकन व कॅरेबियन बेटदेशांबरोबरील आपले व्यापारी संबंध अधिक प्रमाणात विकसित करीत आहे. डॉमनिकन रिपब्लिकमधील एका कार्यक्रमात बोलताना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ही माहिती दिली. गेल्या दशकापासून भारताचे लॅटिन अमेरिकन देशांबरोबरील व्यापारी संबंध अधिक मजबूत होऊ लागले आहेत. हा व्यापार आता 50 अब्ज डॉलर्सच्या जवळ पोहोचला आहे. लॅटिन अमेरिकन देशांमधील इंधनस्त्रोतांमध्ये भारताची गुंतवणूक वाढते आहे. ब्राझिल, मेक्सिको, कोलंबिया आणि गयाना या देशांमधून भारत कच्चे तेल आयात करीत आहे. तर आयटी, औषधनिर्मिती आणि दुचाकी वाहनांच्या क्षेत्रातील भारताची या देशांमधील गुंतवणूक वाढते आहे, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले.

व्यापार 50 अब्जजगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेल्या भारताचे लॅटिन अमेरिकन देशांमधील आर्थिक पातळीवरील अस्तित्त्व आता अधिक प्रभावीपणे जाणवत आहे. भारत जगातील केवळ सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश नाही, तर भारत जगातील कौशल्य आणि गुणवत्ता असलेला देश असून भारत जागतिक उत्पादनाचे केंद्र बनत चालला आहे. आत्ताच्या काळात भारतात सुरू असलेली डिजिटल क्रांती साऱ्या जगाला धडा देणारी आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील भारत दमदार कामगिरी करीत आहे. कोरोनाच्या काळात भारताच्या आरोग्यक्षेत्राच्या क्षमतेची जाणीव जगाला झाली. या काळात आपल्याच देशापुरता विचार केला जात असताना, भारताने निरपेक्षपणे इतर देशांना मानवी सहाय्य पुरविले होते, याची आठवण जयशंकर यांनी यावेळी करून दिली.

दरम्यान, लॅटिन अमेरिकन देशांबरोबरील व्यापाराकडे भारताने अधिक लक्ष केंद्रीत केले असल्याची बाब गेल्या काही वर्षात प्रकर्षाने समोर आली होती. त्याचवेळी लॅटिन अमेरिकन देश देखील भारताबरोबरील आपले आर्थिक सहकार्य अधिक प्रमाणात विकसित करण्यासाठी पावले उचलत आहे. पुढच्या काळात याचे फार मोठे लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला मिळणार असल्याचे दिसू लागले आहे.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या लॅटिन अमेरिकन देशांच्या दौऱ्यात देखील ही बाब ठळकपणे समोर आल्याचे दिसत आहे.

leave a reply