हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या हालचालींवर नौदलाची नजर

- नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरि कुमार

आर. हरि कुमारनवी दिल्ली – हिंदी महासागर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चीनच्या जहाजांचा वावर आहे. देशाच्या सागरी क्षेत्रातील हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी नौदल हिंदी महासागरातील या घडामोडींकडे अत्यंत बारकाईने पाहत आहे, असे नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरि कुमार यांनी म्हटले आहे. हिंदी महासागर क्षेत्रावर भारताचा अधिकार नाही, असे दावे चीनकडून सातत्याने करण्यात येत आहेत. या क्षेत्रावर चीनचा अधिकार असल्याचे सांगून चीन इथे आपले वर्चस्व वाढविण्यासाठी धडपडत आहे, ही बाब लपून राहिलेली नाही. अशा परिस्थितीत नौदलप्रमुखांनी चीनला दिलेला हा इशारा लक्षवेधी ठरतो.

दैनंदिन पातळीवर हिंदी महासागरात चीनची जहाजे वावरताना दिसतात. सध्या तरी ही संख्या मर्यादित असून यामुळे संघर्ष भडकण्यासारखी परिस्थिती नाही. पण ही शक्यता नाकारताही येणार नाही, असे नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरि कुमार म्हणाले. चिनी नौदलाची जहाजे पाकिस्तानच्या बंदरावर बऱ्याच काळासाठी असतात, याची नोंद भारतीय नौदलाने घेतलेली आहे. गेल्या दहा वर्षात चीनच्या नौदलात मोठ्या प्रमाणात पाणबुड्या व युद्धनौकांचा समावेश झालेला आहे, याचीही दखल भारतीय नौदलाने घेतलेली आहे. तसेच चीन तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेची उभारणी करीत आहे. याबरोबरच मोठ्या आकाराच्या विनाशिकांवरही चीन काम करीत आहे, असे नौदलप्रमुखांनी यावेळी बजावले.

हिंदी महासागर क्षेत्रात कुठल्याही क्षणी तीन ते सहा चिनी जहाजांचा वावर असतो. ओमानचे आखात आणि हिंदी महासागर क्षेत्राच्या पूर्वेकडील पट्ट्यात चीनच्या जहाजांचा हा वावर लक्षणीय ठरतो. तसेच चीनची परिक्षण करणारी जहाजे देखील दोन ते चारच्या संख्येने वावरत असतात. तसेच मच्छिमारी करणारी चीनची जहाजे देखील या क्षेत्रात दिसतात. त्यामुळे हिंदी महासागर क्षेत्रात चीनच्या जहाजांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. या साऱ्या हालचालींवर भारताची नजर रोखलेली आहे. ही जहाजे इथे काय करीत आहे, याची अहोरात्र माहिती घेतली जाते व त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे, असे भारतीय नौदलप्रमुखांनी स्पष्ट केले.

विमाने, ड्रोन्स, पाणबुड्या, विनाशिका यांच्या सहाय्याने या हालचालींकडे लक्ष ठेवले जात आहे. देशाच्या सागरी क्षेत्रातील हितसंबंधांच्या रक्षणासाठी भारतीय नौदल सज्ज आहे, असे सांगून यावेळी नौदलप्रमुखांनी देशाला आश्वस्त केले. याबरोबरच नौदल आपली क्षमता सातत्याने वाढवित असून चीनच्या नौदलाबरोबरच पाकिस्तानी नौदलाच्या हालचालींवरही भारताची नजर असल्याची माहिती ॲडमिरल आर. हरि कुमार यांनी दिली.

हिंदी महासागर क्षेत्रात वर्चस्व गाजविण्याची चीनची महत्त्वाकांक्षा भारतामुळे पूर्ण होऊ शकलेली नाही. भारतीय नौदल आपल्याला कुठल्याही क्षणी रोखू शकेल, याची जाणीव चीनला आहे. विशेषतः मलाक्काच्या आखातातील आपली व्यापारी वाहतूक बंद करण्याची क्षमता भारतीय नौदलाकडे आहे, ही बाब चीनला खुपत आहे. भारतानेही या क्षेत्रातील आपल्या नौदलाचे वर्चस्व कायम ठेवले असून इथे आव्हान देऊ पाहणाऱ्या चीनला भारताने त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची तयारी केलेली आहे.

यामुळे चीन हिंदी महासागर क्षेत्र म्हणजे भारताचे पसरदार नाही, असे सांगून यावर असंतोष व्यक्त करीत आहे. त्याचवेळी भारतीय नौदलाचे या क्षेत्रातील वर्चस्व लक्षात घेऊन जगभरातील प्रमुख देश या क्षेत्रात भारताशी सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसते.

leave a reply