भारत आणि अमेरिकेमध्ये मुक्त व्यापारी करारावर चर्चा

'५जी'साठी भारत-अमेरिकेत भागीदारीची शक्यता

नवी दिल्ली – भारत आणि अमेरिकेमध्ये मुक्त व्यापार कराराच्या शक्यता तपासल्या जात असून भारताचे वाणिज्यमंत्री पियुष गोयल आणि अमेरिकेचे वाणिज्यमंत्री विल्बर रॉस यांच्यामध्ये याविषयी चर्चा झाली. मुक्त व्यापार कराराआधी एक मर्यादित व्यापारी करार दोन्ही देशांमध्ये व्हावा यावर एकमत यावेळी झाल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी भारत आणि अमेरिकेमधील आर्थिक सहकार्य दोन्ही देशांसाठी महत्वाचे असल्याचे ‘युएस-इंडिया बिजनेस काउन्सिल’ (यूएसआयबीसी) च्या अध्यक्षा निशा बिस्वाल यांनी अधोरेखित केले. तसेच अमेरिका आणि भारतात ‘५जी’ क्षेत्रात भागीदारी होण्याची शक्यता आहे, असे बिस्वाल यांनी म्हटले आहे.

गेल्याच आठवड्यात पीयूष गोयल यांनी अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय महासंघाबरोबर मुक्त व्यापार करार करण्यास भारत उत्सुक असल्याचे म्हटले होते. भारत व्यापार संबंधी सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. यासाठी कोणतीही रेड लाईन आखण्यात आलेली नाही, असे गोयल म्हणाले होते.

भारत आणि अमेरिकेमध्ये मुक्त व्यापारी करारावर चर्चाया पार्श्वभूमीवर गोयल यांनी अमेरिकेचे वाणिज्यमंत्री रॉस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांमध्ये प्रलंबित आणि मतभेद असलेल्या व्यापारी मुद्दयांवर सोडविण्यासाठी चर्चा सुरु ठेवण्यावर भर देण्यात आला. तसेच दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारी सहकार्याला पूरक गोष्टी ओळखून मुक्त व्यापारी कराराच्या शक्यतांवर चर्चा करण्यात आली. मात्र त्याआधी दोन्ही देशांमध्ये प्रारंभिक मर्यादित व्यापारी करार करण्यावर भारताचे वाणिज्यमंत्री गोयल आणि अमेरिकेचे वाणिज्यमंत्री रॉस यांनी तयारी दर्शविली आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लीगटीझर यांच्याबरोबर गोयल यांनी याच मर्यादित व्यापारी करारासंदर्भांत चर्चा केली होती. दोन्ही देशांमधील सहकार्य परस्पर हित लक्षात घेऊन अधिक व्यापक होत आहे, असे गुरुवारी इंडिया-युएस सीईओ फोरममध्ये बोलताना वाणिज्य मंत्री गोयल म्हणाले.

दरम्यान, ‘युएस-इंडिया बिजनेस काउन्सिल’ने २१ ते २२ जुलै दरम्यान ‘इंडिया आयडिया समिट’चे आयोजन केले आहे. या समिटमध्ये पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी होणार आहेत. ‘इंडिया आयडिया समिट’मध्ये भारत आणि अमेरिकेमधील सहकार्य व्यापक चर्चा होईल, असे ‘यूएसआयबीसी’च्या अध्यक्षा निशा बिस्वाल यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या साथीच्या काळात जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अशावेळीही भारत आणि अमेरिकेचे सहकार्य अधिक दृढ झाले असून कोरोनाच्या व्हॅक्सीनसाठी दोन्ही देश एकत्र काम करीत असल्याचे बिस्वाल म्हणाल्या. तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आणि अमेरिकेतील सहकार्य अधिक व्यापक बनेल. ‘५जी’ नेटवर्क क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्याची शक्यता आहे, असे बिस्वाल यांनी म्हटले आहे.

leave a reply