‘साऊथ चायना सी’वर कुणा एकाचा अधिकार नाही

- भारताची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली – ‘साऊथ चायना सी’च्या संपूर्ण क्षेत्रावर कुणा एकाचा अधिकार नाही. भारत या क्षेत्रातील सागरी तसेच हवाई वाहतुकीच्या स्वातंत्र्याच्या अधिकारांचे ठामपणे समर्थन करतो, अशा स्पष्ट शब्दात भारताने ‘साऊथ चायना सी’बाबतची आपली भूमिका मांडली. काही तासांपूर्वी अमेरिकेने ‘साऊथ चायना सी’वरील चीन करीत असलेले दावे बेकायदेशीर असल्याची घोषणा केली. त्यानंतर भारताने या क्षेत्रावर जगातील सर्वांचाच अधिकार असल्याचे सांगून चीनच्या विस्तारवादी हालचालींना चपराक लगावली आहे.

South-China-Sea‘साऊथ चायना सी’बाबत भारताची भूमिका पहिल्यापासूनच सुस्पष्ट असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले. ‘या क्षेत्रावर कुणा एकाचा अधिकार नसून जगातील सर्व देशांचा या क्षेत्रावर समान अधिकार आहे. म्हणूनच या क्षेत्रातील शांती आणि स्थैर्याला भारत सर्वाधिक महत्त्व देतो’, अशी प्रतिक्रिया श्रीवास्तव यांनी दिली. तर, ‘या क्षेत्रातील हवाई तसेच सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्याला भारताचे पूर्ण समर्थन आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आखून दिलेल्या सागरी नियमांच्या चौकटीत सुरू असलेल्या व्यापारी वाहतुकीलाही भारताचा पाठिंबा आहे’, असे श्रीवास्तव म्हणाले. त्याचबरोबर या क्षेत्रातील कुठलाही वाद सोडविण्यासाठी धमकीचा किंवा लष्करी सामर्थ्याचा वापर न करता राजनैतिक स्तरावर शांततेने हा वाद सोडवावा, असे आवाहन भारताने यावेळी केले.

काही तासांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी ‘साऊथ चायना सी’च्या मुद्द्यावरून चीनवर जोरदार आगपाखड केली होती. ‘साऊथ चायना सी’च्या या क्षेत्रावर चीन करीत असलेले दावे बेकायदेशीर असून २१व्या शतकात चीनच्या विस्तारवादी हालचालींना कुठेही स्थान मिळणार नाही, अशी टीका पॉम्पिओ यांनी केली होती साऊथ चायना सी’चे क्षेत्र आपल्या साम्राज्याचा भाग असल्याचा चीनचा दावा जगातील कुठलाही देश खपवून घेणार नाही. आग्नेय आशियातील आपल्या मित्रदेशांच्या आणि सहकाऱ्यांच्या सार्वभौम अधिकारांच्या सुरक्षेसाठी अमेरिका ठामपणे उभी आहे, असे पॉम्पिओ म्हणाले होते. त्याचबरोबर चीन आपल्या क्षेत्रात घुसखोरी करीत असल्याचे कुठल्याही देशाला वाटत असेल तर अशा देशांना पूर्ण सहाय्य करण्यासाठी अमेरिका तयार असल्याची घोषणा अमेरिकेने केली होती.

South-China-Seaगेल्या काही दिवसांपासून ‘साऊथ चायना सी’वरील चीनच्या एकतर्फी दावेदारीला फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया या आग्नेय आशियाई देशांचा विरोध वाढू लागला आहे. तर अमेरिकेने या क्षेत्रातील चीनची दावेदारी बेकायदेशीर ठरविली आहे. अशा परिस्थितीत भारताने या क्षेत्रावर कुणा एकाचा अधिकार नसून जगातील सर्वांचा अधिकार असल्याचे सांगून चीनला कोंडीत पकडले आहे.

leave a reply