जपानच्या चीनविरोधी आघाडीत भारत सहभागी होणार नाही

- चीनच्या मुखपत्राचा दावा

बीजिंग – भारत आपल्या राष्ट्रहिताला सर्वाधिक प्राधान्य देणारा देश आहे. त्यामुळे जपानने कितीही प्रयत्न केले तरी भारत चीनच्या विरोधात जाणार नाही, असा दावा चीनचे सरकारी वर्तमानपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने केला आहे. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्या भारत भेटीच्या आधी चीनच्या मुखपत्राने हा दावा करून आपण पंतप्रधान किशिदा यांच्या भारतभेटीकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असल्याचे दाखवून दिले आहे. आपल्या या दौऱ्याच्या आधीच जपानच्या पंतप्रधानांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भारताची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे जाहीर केले होते.जपानचे माजी पंतप्रधान अ‍ॅबे शिंजो यांनीच ‘इंडो-पॅसिफिक’ अर्थात हिंदी व पॅसिफिक महासागराचा एकत्रितपणे विचार करण्याची संकल्पना सर्वात आधी मांडली होती. या सागरी क्षेत्रामध्ये चीन करीत असलेल्या वर्चस्ववादी कारवाया रोखण्यासाठी सर्वच देशांनी एकजूट करावी, असे आवाहन त्यावेळी अ‍ॅबे यांनी केले होते. त्याला अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारताकडूनही प्रतिसाद मिळाला होता. पुढच्या काळात अमेरिकेने आपल्या नौदलाच्या पॅसिफिक कमांडचे नाव बदलून ‘इंडो-पॅसिफिक कमांड’ असे केले होते. ही बाब चीनला खटकत असून भारताच्या अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियाबरोबरील सहकार्याकडे चीन नेहमीच संशयाने पाहत आला आहे.

globalTimesChinaकाही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी भारताला भेट देऊन इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारताला असाधारण स्थान असल्याचा दावा केला होता. तर भारताच्या भेटीवर येण्यापूर्वी मुक्त व खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी भारत अतिशय महत्त्वाचा देश असल्याचे जपानचे पंतप्रधान किशिदा म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर, आपल्या मुखपत्राद्वारे चीन जपानच्या इंडो- पॅसिफिक क्षेत्रासंबंधीच्या धोरणांवर टीका करीत आहे. जपानने कितीही प्रयत्न केले तरी भारत चीनच्या विरोधातील आघाडीत सहभागी होणार नाही, असा विश्वास ग्लोबल टाईम्सने व्यक्त केला आहे.भारत राष्ट्रहिताला व जगातील आपल्या स्थानाला फार मोठे महत्त्व देणारा देश आहे. म्हणूनच युक्रेनच्या युद्धात अमेरिकेने दबाव टाकल्यानंतरही भारताने आपला तटस्थपणा सोडला नाही. त्यामुळे चीनच्या विरोधात आपण उभी करीत असलेल्या आघाडीत भारत सहभागी होईल, अशी अपेक्षा जपानने ठेवू नये, असे चीनचे विश्लेषक दा झिगँग यांनी म्हटले आहे. त्याचा दाखला ग्लोबल टाईम्सने दिला.

दरम्यान, भारताच्या तटस्थ परराष्ट्र धोरणावर चीन अलिकडच्या काळात अधिकच विश्वास दाखवू लागला आहे. विशेषतः जपान, ऑस्ट्रेलिया व अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी चीनच्या विरोधात भारताचा वापर करण्याची स्वप्ने पाहू नये. कारण काहीही झाले तरी भारत आपल्या विरोधात जाणार नाही, असे चीन सातत्याने बजावत आहेत. यावेळी प्रसिद्ध केलेल्या लेखात देखील ग्लोबल टाईम्सने चीनबरोबरील राजनैतिक व आर्थिक संबंधांचा विचार करून भारत जपानला साथ देणार नाही, असा निष्कर्ष नोंदविला आहे. पण जपानचे पंतप्रधान किशिदा यांच्या भारतभेटीत चीनला चांगलाच धक्का बसण्याची दाट शक्यता समोर येत आहे.सोमवारपासून सुरू होत असलेल्या पंतप्रधान किशिदा यांच्या या भारतभेटीत दोन्ही देशांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा व सहकार्य करार होतील. या चर्चेमध्ये रशिया व युक्रेनचे युद्ध आणि इंडो- पॅसिफिक क्षेत्रातील घडामोडींवर चर्चा होईल. त्याबरोबरच संरक्षण व सुरक्षा अंतराळ क्षेत्रातील सहकार्य आणि उभयपक्षी व्यापाराबाबत दोन्ही देशांकडून मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत. पंतप्रधान किशिदा या भारताच्या दौऱ्यात जपानमध्ये पार पडणाऱ्या जी७ देशांच्या बैठकीसाठी भारताला आमंत्रित करणार असल्याच्याही बातम्या येत आहेत. लवकरच भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियाच्या क्वाडची बैठकही संपन्न होईल. यावेळीही भारत व जपानच्या पंतप्रधानांची द्विपक्षीय चर्चा अपेक्षित आहे.

हिंदी

 

leave a reply