‘जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत’ भारत महत्वाचे स्थान पटकावेल

- इस्रो प्रमुख के. सिवन यांचा विश्वास

नवी दिल्ली – भारतीय अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्याच्या निर्णयाचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे ( इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे भारतीय अंतराळ क्षेत्रात मोठी प्रगती होईल. यामुळे खाजगी कंपन्यांना रॉकेट आणि उपग्रह बनविण्याची परवानगी मिळेल असे सांगून पुढील काळात ‘जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत’ भारतीय उदयॊगांची महत्वाची भूमिका असेल, असा विश्वास इस्रो प्रमुख के. सिवन यांनी व्यक्त केला.

ISROकाही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्याची घोषणा केली होती, तर बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने संदर्भांतील प्रस्तावाला मंजुरी दिली. याचे इस्रो प्रमुखांनी स्वागत केले आहे. या नव्या धोरणाचा फायदा अंतराळ तंत्रज्ञानाला होणार असल्याचे सिवन म्हणाले. यासाठी ‘ नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर’ या नव्या एजन्सीची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत खाजगी कंपन्यांना अंतराळ क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा लाभ घेता येईल. येत्या तीन ते सहा महिन्यात ही एजन्सी कार्यान्वित होईल, अशी महिती इस्रो प्रमुखांनी दिली.

अमेरिका, चीन आणि युरोपिय देशांमध्ये खाजगी क्षेत्रातील कंपन्या अंतराळ क्षेत्रात कार्यरत आहेत. जगातील अशा देशांच्या यादीत भारत सामील होईल, जेथे अंतराळ क्षेत्रात खाजगी कंपन्यांची चागंली यंत्रणा अस्तित्वात आहे, असे सिवन म्हणाले. भारतातही याआधी ‘चंद्रयान-२’ मोहीमेत उपग्रह आणि इतर सामग्री तयार करण्यासाठी जवळपास ६२० कंपन्या एकत्र आल्या होत्या.

या नव्या उपक्रमासाठी इस्रो उत्सुक आहे. यामुळे भारताचे ‘जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत’ महत्व वाढेल, असा विश्वास सिवन यांनी व्यक्त केला. इस्रो खाजगी कंपन्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करते. यामुळे मेक इन इंडियाला चालना मिळेल. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे सिवन म्हणाले. यामुळे इस्रोच्या अंतराळ कार्यक्रमावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सिवन यांनी स्पष्ट केले. आता इस्रोचे लक्ष्य मानवी अंतराळ मोहिमेकडे आहे. या मोहिमेत खाजगी कंपन्याना सहभागी करुन घेण्याचा इस्रोचा विचार करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

leave a reply