पाकिस्तानमधील उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांची संख्या भारत ५० टक्क्यांनी कमी करणार

नवी दिल्ली – भारतातील आपल्या उच्चायुक्तालयाचा वापर हेरगिरीसाठी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने नवी दिल्लीतील उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील आपल्या अधिकाऱ्यांची संख्या अर्ध्याने कमी करुन या अधिकाऱ्यांना मायदेशी बोलावण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातून होणारी हेरगिरी व पाकिस्तानातील भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना दिला जाणारा त्रास या पार्श्वभूमीवर हा आक्रमक निर्णय घेऊन भारताने पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली.

Pakistan-India-Embassyगेल्याच महिन्यात भारताने पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना हेरगिरी करताना रंगेहाथ पकडले होते. हे अधिकारी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’साठी काम करीत होते. भारताने या दोघांची हकालपट्टी करुन पाकिस्तानला कडक शब्दात समन्स बजावले होते. याचा सूड घेण्यासाठी पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तालयातील दोन कर्मचाऱ्यांना अकारण ताब्यात घेतले होते. आयएसआयने त्यांचा छळ केला होता. भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने गंभीर दखल घेऊन कडक शब्दात याचा निषेध नोंदविला होता. यानंतर दोन्ही अधिकांऱ्याना मुक्त केले होते. हे दोन्ही अधिकारी मायदेशी परतले आहेत. त्यानंतर काही तासातच भारताने हा निर्णय घेतला.

तसेच भारताने पाकिस्तानला नवी दिल्लीतील उच्चायुक्तालयातल्या कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तसेच भारताने इस्लामाबादमधील आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अर्ध्याने कमी करण्याचा निर्णय घेऊन त्यांना मायदेशी बोलावले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच ताणले गेले आहेत.

leave a reply