पाच दिवसात चीनमधून भारतात ४० हजार सायबर हल्ले

नवी दिल्ली – गलवान व्हॅलीमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर गेल्या पाच दिवसात भारतात ४० हजारांहून अधिक सायबर हल्ले झाले आहेत. यातील बहुतांश हल्ले हे चीनमधून झाल्याची माहिती उघड झाली आहे. संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, माहिती प्रसारण मंत्रालयाशी संबधीत वेबसाईट, तसेच भारतीय दूरसंचार कंपन्या, औषध कंपन्या, प्रसार माध्यमांवर आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील बड्या कंपन्यांवर हल्ल्याचे प्रयत्न झाले असून चीनमधून फिशिंग मेलही मोठ्या प्रमाणावर पाठविण्यात आले आहेत. येत्या काही दिवसात आणखी सायबर हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा महाराष्ट्राच्या सायबर इंटेलिजन्स सेलने दिला आहे.

Cyber-Attackमहाराष्ट्राच्या सायबर इंटेलिजन्स सेलचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी चीनमधून होत असलेल्या या सायबर हल्ल्यांची माहिती उघड केली. चार ते पाच दिवसात चिनी हॅकर्सनी ४० हजारांहून अधिक वेळा भारतीय सायबर स्पेसमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, असे यादव यांनी सांगितले. यातील बहुतांश हल्ले हे चीनच्या सिचुआन प्रांताची राजधानी चॅन्गडूमधून झाले आहेत. चिनी लष्कराच्या सायबर वॉरफेअर विंगचे मुख्यालय याच शहरात असल्याचे दावे केले जातात. हे हल्ले करणाऱ्या ‘गॉथिक पांडा’, ‘स्टोन पांडा’ या चिनी हॅकर्स ग्रुपचा संबध चीनच्या सरकारशी असल्याचे सांगितले जाते.

‘डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस’ आणि ‘इंटरनेट प्रॉटोकॉल हायजॅक’ अशा दोन पद्धतीने हे हल्ले होत आहेत, अशी माहिती सायबर इंटेलिजन्स सेलचे महानिरीक्षक यादव यांनी दिली आहे. मात्र भारतीय यंत्रणांनी चिनी सायबर हल्लेखोरांचे हल्ले यशस्वी होऊ दिलेले नाहीत, असेही यादव यांनी स्पष्ट केले.

लडाखमध्ये विश्वासघाती चीनला ज्या पद्धतीने भारतीय जवानांनी उत्तर दिले ते पाहता चीनच्या जागतिक प्रतिमेला तडे गेले आहेत. त्यामुळे चीन आपल्या जवानाची हानी दडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये भारतात चिनी मालावर बहिष्काराची मोहीमही तीव्र झाली आहे. चीनची कंत्राटे रद्द होत आहेत. यामुळे चीन धास्तावल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर चीनकडून हे हल्ले होत आहेत.

कोरोनाव्हायरसमुळे चीनला जगभरातून विरोधाचा सामना करावा लागत आहे. केवळ भारतच नव्हे अमेरिका, काही युरोपीय देश, ऑस्ट्रेलिया, जपान आधी देशांनी चिनी कंपन्यांची गुंतवणूक रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. यामुळे चीन अधिकच अस्वस्थ बनला आहे. चीन आणि ऑस्ट्रलियामध्ये यावरून झालेल्या वादानंतर ऑस्ट्रलियातही असेच सायबर हल्ले होत आहे. यावर ऑस्ट्रलियाने तीव्र पतिक्रिया दिली होती. तसेच एका अहवालानुसार चीन आशिया-प्रशांत क्षेत्रातील आपला वाद असलेल्या देशांवर असे सायबर हल्ले करीत आहे.

leave a reply