सार्वभौमत्त्वावरच्या हल्ल्याला भारत मुखभंग करणारे प्रत्युत्तर देईल

- संरक्षणमंत्र्यांचा चीन व पाकिस्तानला इशारा

हैद्राबाद – ‘भारताला सार्‍या समस्या चर्चेद्वारे सोडवायच्या आहेत. भारताला शांतताच अपेेक्षित आहे. मात्र आपल्या सार्वभौमत्त्वावरचा हल्ला भारत कधीही खपवून घेणार नाही आणि त्याला प्रत्युत्तर देताना जराही कचरणार नाही’, असे संरक्षणमंत्र्यांनी बजावले आहे. कोरोनाची साथ आलेली असताना चीनने आपला खरा चेहरा दाखवून दिला. पण भारत कमजोर नाही, हा नवा भारत आहे, हे चीनला सडेतोड प्रत्युत्तर देऊन देशाने दाखवून दिले’, असे मर्मभेदी उद्गार काढून संरक्षणमंत्र्यांनी चीनसह पाकिस्तानलाही सज्जड इशारा दिला.

हैद्राबाद येथे पार पडलेल्या भारतीय वायुसेनेच्या ‘पासिंग आऊट परेड’ला संबोधित करताना संरक्षणमंत्री बोलत होते. ‘सीमावाद सोडविण्यासाठी भारताची चीनबरोबर लष्करी व राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. भारताला संघर्ष अपेक्षित नाही, तर भारताला शांतता हवी आहे. मात्र काहीही झाले तरी भारत आपल्या सार्वभौमत्त्वावर हल्ला खपवून घेणार नाही. भारत आपल्या भूभागात होणार्‍या कुठल्याही प्रकारची घुसखोरी, आक्रमता आणि एकतर्फी कारवाई सहन करणार नाही. याला मुखभंग करणारे प्रत्युत्तर दिल्यावाचून भारत स्वस्थ बसणार नाही’, असे सांगून संरक्षणमंत्र्यांनी देशाचा निर्धार व्यक्त केला.

भारताला अनेक देशांचे सहकार्य लाभले आहे, असे सांगून आंतरराष्ट्रीय जनमत भारताच्या बाजूने असल्याचा दावा संरक्षणमंत्र्यांनी केला. त्याचवेळी कोरोनाची साथ आलेली असताना, चीनने आपला खरा चेहरा दाखविला, असा टोला लगावून संरक्षणमंत्र्यांनी चीनच्या कारस्थानावर प्रकाश टाकला. कोरोनाच्या काळात चीनने लडाखच्या एलएसीवर घुसखोरीचा प्रयत्न करून यावर भारताची कोणती प्रतिक्रिया उमटते, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, असे काही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. थेट उल्लेख न करता, हा संदर्भ पकडून संरक्षणमंत्र्यांनी चीनच्या या घुसखोरीला मुखभंग करणारे प्रत्युत्तर भारताने दिल्याचे म्हटले आहे. एकाच दिवसापूर्वी संरक्षणमंत्र्यांनी चंदीगड येथील आर्मी लिट्रिचर फेस्टीव्हलला संबोधित करताना चीनला सणसणीत चपराक लगावली होती.

भारताचा शेजारी देश पश्‍चिम सीमेवर नापाक हालचाली करीत असल्याचे सांगून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला लक्ष केले. आत्तापर्यंत पाकिस्तान भारताबरोबर झालेल्या चार युद्धात पराभूत झालेला आहे. तरीही या देशाने भारताच्या विरोधात दहशतवादाचा वापर करून छुपे युद्ध छेडण्याचे थांबविलेले नाही. मात्र पाकिस्तानच्या या छुप्या युद्धाला भारतीय लष्कर, सीमा सुरक्षा दल तसेच पोलिसांकडून दणदणीत उत्तर दिले जात आहे, असे सांगून यासाठी संरक्षणमंत्र्यांनी सुरक्षा दलांची प्रशंसा केली.

भारत केवळ सीमेवर दहशतवादाचा मुकाबला करीत नाही. तर आता दुसर्‍या देशाच्या सीमा ओलांडून भारत दहशतवाद्यांवर प्रहार करीत आहे. बालाकोट येथे भारतीय वायुसेनेने चढविलेल्या हल्ल्याद्वारे ही बाब स्पष्ट झालेली आहे. याद्वारे भारताने दहशतवादाच्या विरोधातील युद्धात आपला निर्धार व्यक्त केला आणि सार्‍या जगाला याची जाणीव करून दिली, असे सांगून सांगून संरक्षणमंत्र्यांनी यावर समाधान व्यक्त केले. दरम्यान, संरक्षणमंत्र्यांची आक्रमक भाषा चीन तसेच पाकिस्तानलाही परखड संदेश देणारी असल्याचे स्पष्ट होत आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून भारताची चीनबाबतची भाषा बदलल्याचे दिसू लागले आहे. आत्तापर्यंत चीनच्या विरोधात आक्रमक भाषेचा प्रयोग टाळून भारताने राजनैतिक पातळीवरील मुत्सद्देगिरीचा परिचय देणार्‍या भाषेचा वापर केला होता. पण चीनवर त्याचा प्रभाव पडत नसल्याने, भारतीय नेते आक्रमकपणे चीनला उत्तर देत आहेत. अधिकृत पातळीवर चीन याला उत्तर देत नसला तरी याचे फार मोठे दडपण चीनवर आल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

leave a reply