भारत अन्न व इंधनाच्या सुरक्षेसाठी कार्य करीत आहे

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

पनामा सिटी – पूर्व आणि पश्चिमेकडील देशांमध्ये ध्रुवीकरण होत असताना व उत्तर आणि दक्षिणकडील देशांमधली दरी वाढत असताना, भारत या सर्वांना जोडण्याचे काम करीत आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. गयानामधून पनामा या मध्य अमेरिकन देशाच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारताची ही भूमिका स्पष्ट केली. त्याचवेळी अन्न व इंधनाच्या सुरक्षेसाठी भारत विशेष प्रयत्न करीत आहे, कारण यामुळे विकसनशील देशांची आर्थिक प्रगती सुनिश्चित होते, असे जयशंकर पुढे म्हणाले.

भारत अन्न व इंधनाच्या सुरक्षेसाठी कार्य करीत आहे - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरबेलीझ, कोस्टारिका, डॉम्निकन रिपब्लिक, अल सल्वादोर, ग्वाटेमाला, होंडुरास, निकारागुआ आणि पनामा हे देश सदस्य असलेल्या ‘सेंट्रल अमेरिकन इंटिग्रेशन सिस्टीम’या (एसआयसीए) संघटनेची भारताबरोबरील चौथी बैठक पार पडली. पनामा येथे पार पडलेल्या या बैठकीत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारतात होणाऱ्या जी२०च्या बैठकीत विकसनशील व गरीब देशांची बाजू मांडली जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच भारत अन्न व इंधनाच्या सुरक्षेसाठी करीत असलेल्या व्यापक प्रयत्नांचीही जाणीव यावेळी जयशंकर यांनी करून दिली. यासाठी भारत भरडधान्याचा पुरस्कार करीत आहे, असे जयशंकर म्हणाले.

पूर्व आणि पश्चिमेकडील देशांमध्ये ध्रुवीकरण होत असताना व उत्तर आणि दक्षिणकडील देशांमधली दरी रुंदावत चालली आहे. अशा काळात भारत या सर्वांना जोडणारा पूल म्हणून काम करीत असल्याचा दावा जयशंकर यांनी केला. कारण वसुधैव कुटुंबकम्‌‍ हे भारताचे धोरण असून या संकल्पनेनुसार विश्व हे एक कुटुंबच आहे, असे भारत मानतो. कोरोनाची साथ आलेली असताना, भारताने वॅक्सिन मैत्री मोहीम राबवून गरीब व विकसनशील देशांना कोरोनाची लस पुरविली होती, याची आठवण या निमित्ताने जयशंकर यांनी करून दिली.

कोरोनाची साथ व त्यानंतर पेटलेले युक्रेनचे युद्ध यामुळे जगसमोर खडी ठाकलेली संकटे व हवामानबदलाचे परिणामांच्या आव्हानांचाही जगाला सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत ग्लोबल साऊथचा भाग असलेल्या १२५ देशांची परिषद आयोजित करून भारताने या देशांचा आवाज अधिक प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याची तयारी केली आहे, याकडेही भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले.

leave a reply