भारताच्या वायुसेनाप्रमुखांचा चीनला खणखणीत इशारा

बंगळुरू – भारताला धमकावण्यासाठीही चीनने पाकिस्तानसारख्या देशाचे सहाय्य घेतले तरी ती चीनची घसरण ठरते. आपल्या सामर्थ्यावर चीनचा विश्‍वास उरलेला नाही, हे यातून सिद्ध होईल, असा टोला भारताचे वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी लगावला आहे. त्याचवेळी चीन भारताबरोबर संघर्ष छेडण्याची चूक करणार नाही. पण वेळ आलीच तर भारत एकाच वेळी चीन व पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे, असे वायुसेनाप्रमुखांनी पुन्हा एकदा ठणकावले.

बंगळुरू येथील एरो इंडियाच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना वायुसेनाप्रमुखांनी चीनपासून असलेल्या धोक्यावर आपली परखड प्रतिक्रिया नोंदविली. भारतीय वायुसेना चीनसारख्या बलाढ्य देशाशी टक्कर घेऊ शकेल का? या प्रश्‍नाला उत्तर देताना वायुसेनाप्रमुखांनी याबाबत कुणीही संशय घेऊ शकत नाही, असे ठासून सांगितले. वायुसेनेसह देशाच्या तिन्ही संरक्षणदलांकडे चीनचा सामना करण्याची पूर्ण क्षमता आहे आणि याबाबत कुठल्याही प्रकारचा संदेह असू शकत नाही, असे स्पष्ट केले.

चीन पाकिस्तानबरोबर हातमिळवणी करून भारताला दोन आघाड्यांवर युद्धात खेचेल, अशी दाट शक्यता सामरिक विश्‍लेषक तसेच माजी लष्करी अधिकार्‍यांकडून व्यक्त केली जाते. चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने तशा धमक्याही भारताला दिल्या होत्या. विशेषतः लडाखच्या एलएसीवरील गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर चीन भारताला पाकिस्तान व नेपाळच्या सीमेवर गुंतविण्याचे इशारे देऊ लागला होता. या पार्श्‍वभूमीवर, वायुसेनाप्रमुखांनी चीनला जबरदस्त चपराक लगावली आहे.

भारतावर कुरघोडी करण्यासाठी चीनने पाकिस्तानसारख्या देशाशी हातमिळवणी केलीच, तर ती चीनसाठी घसरण ठरेल. स्वतःला लष्करीदृष्ट्या सामर्थ्यशाली मानणार्‍या देशाला दुसर्‍या देशाला धमकावण्यासाठीही तिसर्‍या देशाचा वापर करावा लागत असेल, तर तुम्ही कमकुवत आहात, असा त्याचा अर्थ होतो, असा टोला वायुसेनाप्रमुखांनी लगावला. असे असले तरी भारत एकाच वेळी चीन व पाकिस्तानच्या आघाडीवर युद्धासाठी सज्ज आहे, अशी ग्वाही वायुसेनाप्रमुख भदौरिया यांनी दिली.

वायुसेनेच्या ताफ्यात ११ रफायल विमाने आलेली आहेत. तसेच सुखोई-३० एमकेआय विमानांची संख्याही वाढत चाललेली आहे. त्याचवेळी तेजसचे दुसरे स्क्वाड्रन तयार होत आहे. यामुळे आता वायुसेनेच्या लढाऊ विमानांची संख्या कमी होणार नाही, उलट ती वाढत जाईल, असा विश्‍वास वायुसेनाप्रमुखांनी व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर आगामी काळात तेजस विमानांची ३० स्क्वाड्रन वायुसेनेच्या ताफ्यात सहभागी करून घेण्याचा विचार असल्याचे वायुसेनाप्रमुखांनी स्पष्ट केले.

सध्या लडाखच्या एलएसीवरील तणाव कायम आहे, असेही वायुसेनाप्रमुखांनी स्पष्ट केले. या क्षेत्रात चीनने अधिक तैनाती केली, तर भारतही अधिक तैनाती करून त्याला उत्तर देईल. पण चीनने इथला तणाव कमी करण्यासाठी हालचाली सुरू केला, तर भारत त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्यावाचून राहणार नाही, असेही वायुसेनाप्रमुखांनी म्हटले आहे. त्यामुळे एलएसीवर चीनला संघर्ष हवा आहे की सौहार्द ते सर्वस्वी चीनवरच अवलंबून असल्याचे वायुसेनाप्रमुखांनी लक्षात आणून दिले आहे.

नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील संरक्षणासाठी करण्यात आलेल्या तरतुदीवरही वायुसेनाप्रमुखांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली. कोरोनाच्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण आलेला आहे आणि अशा परिस्थितीतही संरक्षणखर्चात करण्यात आलेली २० टक्क्यांची वाढ ही फार मोठी ठरते, असे सांगून वायुसेनाप्रमुखांनी त्यावर समाधान व्यक्त केले.

leave a reply