लडाखमध्ये चीन सीमेनजीक भारतीय लष्कराचा भीष्म रणगाड्यांद्वारे युद्धाभ्यास

भीष्मनवी दिल्ली – लडाखमध्ये भारतीय लष्कर टी-९० भीष्म रणगाडे आणि टी-७२ अजय रणगाड्यांद्वारे युद्धाभ्यास करीत आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १४ हजार फूट उंचीवरील क्षेत्रात हा युद्धाभ्यास सुरू असून याद्वारे चीनला योग्य तो संदेश दिला जात आहे. नुकतेच भारत आणि चीनमध्ये १२ व्या फेरीतील चर्चा संपन्न झाल्यावर चीनने लडाखच्या गोग्रामधून आपले सैनिक मागे घेतले आहेत. मात्र हॉट स्प्रिंग आणि डेप्सांगमध्ये अजूनही चीनचे जवान मागे गेलेले नाहीत. त्यामध्ये चीन सीमेजवळील क्षेत्रात युद्धाभ्यास करून, तसेच सीमेजवळील हवाई तळाचा विस्तार करून भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय लष्कराचा येथील प्रतिकूल वातावरणात रणगाड्यांसह सुरु असलेला युद्धाभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरतो.

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात चीनच्या जवानांनी लडाखच्या विविध भागात घुसखोरी केल्यानंतर सुरू झालेला तणाव अजूनही निवळलेला नाही. गेल्यावर्षी जूनमध्ये गलवानमध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये मोठा संघर्ष झाला होता. यामध्ये भारताचे २० जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर भारताने चीनला लागून असलेल्या सर्वच सीमा भागातील तैनाती वाढविली आहे. तसेच येथे अत्याधुनिक संरक्षण यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. १४ हजार ते १७ हजार फूट उंचीवरील प्रतिकूल वातावरण असते भारताने येथेही रणगाडे तैनात केले आहेत. यामध्ये टी-९० भीष्म रणगाडे आणि टी-७२ अजय रणगाड्यांचा समावेश आहे.

ऑपरेशन ‘स्नो लेपर्ड’अंतर्गत चीनच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी भारताने इतक्या उंचीवर हे रणगाडे तैनात केले आहेत. उणे ४० सारख्या तापमानातही ही तैनाती कायम ठेवण्यात आली होती. इतक्या कमी तापमानात आणि दुर्गम भागात रणगाडे संचलीत करणे फार कठीण काम असते. मात्र गेल्या काही महिन्यात भारतीय लष्कराने या भागात रणगाड्यांचे संचलन करण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर (एसओपी) खूपच विकसित केली आहे. या भागात कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्जता कायम ठेवण्यात आली आहे. लडाखमध्ये चीनबरोबरील एलएसीपासून ४० किलोमीटर दूरीवर सुमारे १४ हजार फुटावरील उंचीवर भीष्म आणि अजय रणगाड्यांद्वारे सुरू असलेला सराव याचाच भाग ठरतो.

leave a reply