भारतीय लष्करप्रमुख दक्षिण कोरियाच्या भेटीवर

सेऊल – भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचा तीन दिवसांचा दक्षिण कोरिया दौरा सुरू झाला आहे. याआधी म्यानमार, नेपाळ, संयुक्त अरब अमिरात व सौदी अरेबिया या देशांना जनरल नरवणे यांनी भेट दिली होती. त्यानंतर लष्करप्रमुखांचा हा दक्षिण कोरिया दौरा लक्ष वेधून घेणारा ठरतो. त्यांच्या या भेटीत भारत व दक्षिण कोरियाचे लष्करी सहकार्य अधिकच व्यापक बनेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. याआधी संरक्षणसाहित्याच्या निर्मिती क्षेत्रात भारताबरोबर सहकार्य करण्यासाठी दक्षिण कोरियाच्या कंपन्यांनी उत्सुकता दाखविली होती.

लष्करप्रमुख

दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री तसेच या देशाच्या लष्करप्रमुखांशी जनरल नरवणे यांची चर्चा संपन्न होणार आहे. तसेच दक्षिण कोरियाच्या लष्करप्रमुखांसोबत जनरल नरवणे या देशातील महत्त्वाच्या लष्करी तळांना भेट देणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे उभय देशांच्या संरक्षणविषयक सहकार्याला चालना मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला जातो. २०१५ साली भारत आणि दक्षिण कोरियामध्ये विशेष धोरणात्मक भागीदारीबाबतचा करार संपन्न झाला होता. शस्त्रास्त्रे तसेच संरक्षणसाहित्याच्या संयुक्त निर्मिती प्रकल्पांवर भारत आणि दक्षिण कोरियाची चर्चा सुरू आहे.

विशेषतः नौदलासाठी आवश्यक असलेल्या युद्धनौका व इतर जहाजांसाठी दोन्ही देश सहकार्य करण्यासाठी विशेष उत्सुकता दाखवित असल्याचे बोलले जाते. ‘के ९ वज्र टी’ ही तोफ भारत व दक्षिण कोरियाच्या कंपनीने संयुक्तरित्या विकसित केली आहे. भारताची ‘लार्सन अँड टुब्रो’ आणि कोरियाच्या ‘एचटीडब्ल्यू’ या कंपनीने सदर तोफ विकसित केली. याचा वापर भारतीय लष्करासाठी करण्यात येत आहे. तसेच भारत व दक्षिण कोरियामध्ये नौदलासाठी आवश्यक असलेलीस सागरी सुरुंग निकामी करणारी ‘माईनस्वीपर’ विकसित करण्याबाबत चर्चा झाली होती. यासाठी संयुक्त प्रकल्प उभारण्याचेही दोन्ही देशांनी मान्य केले होते. पण हा प्रकल्प वेग घेऊ शकला नाही. तसेच संरक्षणसाहित्याच्या निर्मितीक्षेत्रात असलेली दक्षिण कोरियन कंपनी भारताला विमानभेदी क्षेपणास्त्र यंत्रणा पुरविण्यास उत्सुक असल्याचे समोर आले आहे. लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या या दौर्‍यात या सार्‍या व्यवहारांना चालना मिळू शकते. चीन भारताच्या प्रभावक्षेत्रात शिरून कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असताना, भारताने आपल्या ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ अर्थात पूर्वेकडील देशांबरोबरील सहकार्य दृढ करण्यासाठी वेगाने पावले टाकण्याची सुरूवात केली आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या तसेच तंत्रज्ञानात पुढारलेल्या दक्षिण कोरियाबरोबरील भारताच्या संबंधांना फार मोठे महत्त्व आहे.

गेल्या वर्षी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दक्षिण कोरियाला भेट दिली होती. दक्षिण कोरियन कंपन्यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केले होते. लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या दक्षिण कोरिया भेटीमुळे उभय देशांमधील या सहकार्याचा पुढचा टप्पा सुरू होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. चीनच्या आर्थिक व लष्करी सामर्थ्याच्या दडपणाखाली वावरणार्‍या दक्षिण कोरियालाही भारताबरोबरील सर्वच क्षेत्रातील सहकार्य वाढविणे अत्यावश्यक वाटू लागल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply