झटपट कर्ज देणार्‍या अ‍ॅप्सचा चीनशी संबंध

- बंगळुरू सीआयडीच्या तपासात मोठा खुलासा

नवी दिल्ली – हैदराबादमध्ये झालेल्या पाच आत्महत्यांनंतर अवाजवी दराने बेकायदा कर्ज देणार्‍या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा खुलासा झाला होता. यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कमीत कमी कागदपत्रात झटपट कर्ज देणार्‍या ऑनलाईन अ‍ॅप्सबाबात ग्राहकांना सावधनतेच्या सूचना दिल्या होत्या. याच प्रकरणात बंगळुरू पोलिसांच्या गुन्हे अन्वेषन विभागाच्या तपासात खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. तत्काळ कर्ज देणार्‍या या अ‍ॅप्सचा संबंध चीनशी असल्याचे तपासात लक्षात आले आहे. बनावट कंपन्या स्थापून हे रॅकेट चालविले जात असून ग्राहकांची माहिती चोरून त्याचा दुरुपयोगही केला जात असल्याचा दावा बंगळुरू सीआयडीने केला आहे.

झटपट कर्ज

ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे झटपट कर्ज घेणार्‍या ग्राहकांना कर्जवसुलीसाठी धमक्या देण्याचे आणि कर्जदारांच्या दूरध्वनीचाही गैरवापर केला जात असल्याचे प्रकार समोर आले होते. तसेच कर्ज घेतलेल्या कंपन्यांकडून त्रास देण्यात येत असल्याने ग्राहकांनी आत्महत्या केल्याच्या आतापर्यंत पाच घटना तेलंगाणामध्ये समोर आल्या आहेत. अशाच एका प्रकरणात पोलिसांना तक्रार मिळाल्यावर जोरदार कारवाई सुरू झाली आहे. याच प्रकरणात रविवारी पुण्यातील एका कॉल सेंटरवर छापा टाकून तेलंगाणा पोलिसांनी तिघा जणांना अटक केली. यामध्ये एका चिनी महिलेचा समवेश आहे. या कॉल सेंटरमधून १०१ लॅपटॉप आणि १०६ मोबाईल जप्त करण्यात आले. तसेच कंपनीचे बँक खातेही गोठविण्यात आले.

ऑनलाईन कर्ज घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत एकूण तीन चिनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. २५ डिसेंबरला सायबराबाद पोलिसांनी ई बय उर्फ डेनिस नावाच्या चिनी नागरिकाला अटक केली होती. ई बय मुळचा शांघायमधील असून दिल्लीत वास्तव्य करुन होता. तसेच कर्ज देणार्‍या ११ अ‍ॅप्स चालवित होता. याद्वारे २० ते ४० वयोगटातील नोकरदार आणि छोट्या व्यवसायिकांना अवाजवी दराने झटपट कर्ज दिली जात होती. याआधी ऑक्टोबर महिन्यातही चिनी नागरिकाला बेकायदा बेटींग अ‍ॅप्स प्रकरणी अटक झाली होती. याद्वारे भारतीयांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यानंतर अशा कर्जदारांना त्रास देणार्‍या, त्यांना धमक्या देणार्‍या, सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करून त्यांची बदनामी केल्याच्या सात प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी आतापर्यंत १८ जणांना अटक केली आहे. दिल्ली, गुरूग्राम आणि हैदराबादमधूनही या अटक झाल्या आहेत. तसेच हैदराबाद पोलिसांनी आतापर्यंत ७५ बँक खाती गोठवली असून यामध्ये ४७३ कोटी रुपये जमा आहेत.

दरम्यान, झटपट कर्ज देणार्‍या अ‍ॅप्सद्वारे ग्राहकांच्या माहितीची चोरी केल्याच्या एका प्रकरणात बंगळुरू पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. ही झटपट कर्ज देणारी अ‍ॅप्स चीनशी संबंधीत असल्याचा दावा बंगळुरू गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर सेलने केला आहे. या संदर्भात वैज्ञानिक पुरावे सापडले आहेत, असा दावा पोलीस अधिक्षक एम.डी. शरथ यांनी केल्याचे वृत्त आहे. बंगळुरू पोलिसांनी या प्रकरणात दोन कंपन्यांवर छापे टाकले, या दोन्ही कंपन्या चीनमधून संचालित होत होत्या. कंपन्यांकडून संचालित केल्या जाणारे अ‍ॅप्सचे सर्व्हर आणि डॅशबोर्ड चीनमधील होते. तसेच कंपन्यांचे संचालकही चिनी आहेत. याशिवाय बंगळुरू सीआयडीला आणखी एका कंपनीची माहिती मिळाली असून या कंपनीकडून झटपट कर्जाचे आमिष दाखविणारी १० अ‍ॅप्स चालविली जात असल्याचा दावाही या वृत्त अहवालात करण्यात आला आहे.

leave a reply