चीनला इशारा देण्यासाठी लडाखच्या एलएसीवर भारतीय सैन्याचा युद्धसराव

लडाखच्या एलएसीवरलडाख – पूर्व लडाखमध्ये १४ हजार फूटांवर युद्धसराव करून भारतीय सैन्याने चीनला आपल्या क्षमतेची जाणीव करून दिली. लडाखच्या एलएसीवर भारतीय सैन्याला आव्हान देण्याची तयारी करीत असलेल्या चीनने आपल्या जवानांसाठी ‘मोबाईल ऑक्सिजन गिअर्स’ अर्थात प्राणवायुचा पुरवठा करणारी यंत्रणा तयार केली आहे. गेल्या वर्षी लडाखचे हवामान सहन न झाल्याने चीनचे कितीतरी जवान आजारी पडले होते तर चीनच्या एक वरिष्ठ अधिकार्‍याला या हवामानामुळे जीव गमवावा लागला होता. त्या पार्श्‍वभूमीवर, भारतीय सैन्याचा तीन दिवसांचा हा युद्धसराव लक्षवेधी ठरतो. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी याची दखल घेतली आहे.

पूर्व लडाखमध्ये ‘शत्रूजित’ नावाच्या या युद्धसरावात भारतीय सैन्याने पॅराजंपिंग करून शत्रूच्या तावडीतून भूमी सोडविण्याचा सराव केला. समुद्रसपाटीपासून १४ हजार फूट उंचीवरील हा युद्धाभ्यास भारतीय सैन्याच्या क्षमतेचे प्रदर्शन घडविणारा ठरला. यात शत्रूच्या तावडीतून आपली भूमी सोडविण्याच्या सरावाचा समावेश होता. याची गंभीर दखल चीनला घ्यावी लागली. कारण गेल्या काही महिन्यांपासून चीनने लडखच्या एलएसीजवळील आपली तैनाती प्रचंड प्रमाणात वाढविली आहे. वरकरणी चीन याद्वारे आक्रमकता प्रदर्शित करीत असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात चीनची ही कारवाई बचावात्मक असल्याचा दावा काहीजण करीत आहेत.

गलवानमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची कल्पना चीनला आली. त्याचवेळी भारतीय सैन्याशी टक्कर घेण्याची क्षमता चिनी जवानांकडे नसल्याचेही यामुळे स्पष्ट झाले होते. दूर्गम पहाडी क्षेत्रातील युद्धतंत्रात भारतीय सैन्य जगात सर्वोत्तम असल्याचे मानले जाते. अशा परिस्थितीत भारताने निर्णय घेतलाच तर भारतीय सैन्य ‘अक्साई चीन’चा ताबा सहजपणे घेऊ शकतील, अशी चिंता चीनला वाटू लागली आहे. त्यातच भारतीय सैन्याने या क्षेत्रात ‘के-९ वज्र’ तोफा तैनात करून या क्षेत्रातील आपली क्षमता अधिकच वाढविली होती.

या पार्श्‍वभूमीवर, चीनने एलएसीजवळील क्षेत्रात युद्धसराव करून भारतीय सैन्यावरील दडपण वाढविण्याचा प्रयत्न करून पाहिला. यानंतर भारतानेही चीनला प्रत्युत्तर देणार्‍या सरावांचे आयोजन सुरू केले होते. लडाखच्या एलएसीवरील क्षेत्रात आपला प्रभाव पडत नाही, हे लक्षात आल्यानंतर चीनने अरुणाचल प्रदेशमधील एलएसीवर कारवाया सुरू केल्या होत्या. या क्षेत्रातही सावध असलेल्या भारतीय सैन्याने चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी केलेली आहे. भारतीय सैन्याच्या या आक्रमक डावपेचांची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतली आहे. पुढच्या काळात एलएसीवरील तणाव अधिकच वाढू शकतो, असे आंतरराष्ट्रीय माध्यमे विश्‍लेषकांच्या हवाल्याने सांगत आहेत.

leave a reply