म्यानमारच्या लष्कराने १६० घरे पेटवून दिली

- सॅटेलाईट फोटोग्राफ्समुळे याचे पुरावे समोर आल्याचा मानवाधिकार संघटनेचा ठपका

१६० घरेबँकॉक – गेल्या महिन्यात म्यानमारच्या लष्कराने वायव्य प्रांतातील थांतलांग शहरावर केलेल्या ‘फायर बॉम्ब’च्या हल्ल्यात १६० घरे पेटवून दिली. यात एका अनाथालयाचा देखील समावेश असल्याचा आरोप झाला होता. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या बातमीला मानवाधिकार संघटनेने दुजोरा दिला आहे. सॅटेलाईट फोटोग्राफ्समधून याची पुष्टी झाली असून जुंटा राजवटीने हीन पातळीवरील ही कारवाई केल्याची घणाघाती टीका मानवाधिकार संघटनेने केली आहे.

जुंटा राजवटीविरोधात सशस्त्र बंड करणार्‍या आणि त्यांना समर्थन देणार्‍यांविरोधात म्यानमारच्या लष्कराने भीषण मोहीम छेडली आहे. गेल्या आठवड्यात २९ ऑक्टोबर रोजी म्यानमारच्या चिन परांतातील थातलांग शहरात म्यानमारच्या लष्कराने आगगोळ्यांचा भीषण वर्षाव केला. सुमारे दोन हजार वस्त्यांच्या शहरात चढविलेल्या या हल्ल्यात किमान १६० घरे जळून खाक झाली. आगीने पेटलेल्या या शहराचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते.

गेल्या आठवड्यात ‘चिनलँड डिफेन्स फोर्सेस’च्या बंडखोरांच्या हल्ल्यात म्यानमारच्या लष्कराचा जवान ठार झाला होता. त्याच्याविरोधात म्यानमारच्या लष्कराने ही भीषण कारवाई केल्याचा दावा केला जातो. या आगीत दोन प्रार्थनास्थळांचे नुकसान झाले. तसेच एक अनाथालय देखील बेचिराख झाले.

या घटनेवर जगभरातून प्रतिक्रिया उमटली होती. चिनलँडमधील घरांवर झालेले हल्ले म्हणजे मानवाधिकारांचे उघड उल्लंघन असल्याची टीका अमेरिकेने केली होती. त्याचबरोबर म्यानमारचे लष्कर या भागात करीत असलेल्या कारवाईवर अमेरिकेने चिंता व्यक्त केली होती. आंतरराष्ट्रीय माध्यमांनाही या घटनेची दखल घ्यावी लागली.

१६० घरेम्यानमारच्या लष्कराने माध्यमांवर नियंत्रण ठेवल्यामुळे या हल्ल्यात जीवितहानी झाली का, याची माहिती समोर आलेली नाही. पण थातलांग शहरातील घरांना आग लागल्याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्समुळे उघड झाले आहे. मानवाधिकार संघटनेने आपल्या संकेतस्थळावर सॅटेलाईट सेंसरद्वारे मिळविलेला ‘थर्मल अनोमली’ फोटोग्राफ प्रसिद्ध केला. किमान १२ तास येथील घरे आगीत धुमसत होती, असे मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे.

म्यानमारच्या लष्कराने या घटनेसाठी सशस्त्र बंडखोरांना जबाबदार धरले आहे. पण जुंटा राजवटीने याआधीही २०१२, २०१६ आणि २०१७ साली अशा प्रकारे नागरी वस्त्यांवर फायर बॉम्बचे हल्ले चढविल्याची आठवण मानवाधिकार संघटनेने करून दिली आहे. दरम्यान, म्यानमारच्या लष्कराने लोकशाहीवादी सरकार सत्तेतून बेदखल केल्यापासून गेल्या नऊ महिन्यांमध्ये १,२३३ जणांचा बळी गेला असून ८५ हजारांहून अधिक जण विस्थापित झाल्याचा दावा केला जातो.

लष्कराची राजवट उलथून पुन्हा या देशात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी म्यानमारच्या राजकीय कार्यकर्ते व जनतेला शस्त्रे हातात घ्यावी लागत आहेत. म्यानामारच्या नेत्यांनी यासाठी जनतेला आवाहन केले असून म्यानमारमधील इतर वांशिक गट व बंडखोर देखील जुंटा राजवटीच्या विरोधात खडे ठाकले आहेत. मात्र चीनकडून सर्वतोपरी सहाय्य मिळत असलेल्या म्यानमारच्या लष्करी राजवटीने अत्यंत कू्ररपणे आपल्या विरोधातील आंदोलन चिरडण्याची तयारी केली आहे. चीनच्या पाठिंब्यामुळे म्यानमारच्या राजवटीला आंतरराष्ट्रीय टीका व दडपणाची पर्वा करण्याची गरजच नसल्याचे दिसत आहे.

leave a reply