भारतीय लष्कर 120 कामिकाझी ड्रोन्सची खरेदी करणार

नवी दिल्ली – प्रतिहल्ला करण्याच्या क्षमतेत वाढ करण्याबरोबर युद्धकाळात शत्रूच्या ठिकाणांवर हल्ले चढविण्यासाठी प्रभावी अस्त्र ठरू शकणाऱ्या ‘कामिकाझी ड्रोन्स’ची खरेदी लष्कर करणार आहे. 120 ‘कामिकाझी ड्रोन्स’च्या खरेदीसाठी लष्कराने प्रक्र्रिया सुरू केली असून रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) काढण्यात आले आहे. जलदगती प्रक्रियेअंतर्गत ही ड्रोन खरेदी केली जाणार असून त्याचबरोबर 10 एरियल टार्गेटिंग सिस्टिमही खरेदी केल्या जाणार आहेत.

droneरशिया-युक्रेन युद्धात अशा ‘कामिकाझे ड्रोन्स’चा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये झालेल्या युद्धात अझरबैजानने अशा ड्रोनचा वापर करून अर्मेनियावर विजय मिळविला होता. चीनकडून हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन ‘ईस्ट चायना सी’ मधील आपल्या बेटांच्या सुरक्षेसाठी जपानही अशाच प्रकारची ड्रोन तैनात करीत आहे. भारतीय संरक्षणदलांनीही ‘कामिकाझी ड्रोन्स’ आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. भविष्यातील युद्धात हे तंत्रज्ञान अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारतीय लष्कराने 120 ‘कामिकाझी ड्रोन्स’च्या खरेदीसाठी ‘आरएफपी’ काढली आहे. मेक इन इंडियाअंतर्गत ही खरेदी होणार आहे. येणाऱ्या प्रस्तावांची छाननी करून येत्या काही महिन्यातच पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ‘कामिकाझी ड्रोन’ला आत्मघाती ड्रोन किंवा किलर ड्रोन म्हणूनही ओळखले जाते. तसेच दुर्गम आणि अतिउंचीवरील भागातसुद्धा ही ड्रोन वापरली जाऊ शकतात. स्फोटकाने भरलेली ही ड्रोन आपले लक्ष्य निर्धारीत करून त्यावर जाऊन आदळतात. ही ड्रोन आकाराने लहान असल्यामुळे व कमी उंचीवरुन उडत असल्याने रडारला चकमा देतात आणि शत्रूची ठिकाणे, त्यांच्या लष्करी साहित्याचे मोठे नुकसान करतात.

ही ड्रोन चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात केली जाणार आहेत. या दोन्ही पश्चिम व पूर्व सीमेवर भारतीय संरक्षणदलांनी आधीच जय्यत तयारी केली आहे. चीन आणि पाकिस्तान दोन्ही आघाड्यांवर एकाचवेळी लढण्याची क्षमता संरक्षणदल वाढवित आहे. यासाठी कित्येक अत्याधुनिक यंत्रणा, रडार, तोफा, रॉकेट व क्षेपणास्त्र यंत्रणांची खरेदी केली जात आहे. कामिकाझी ड्रोनची खरेदी त्याचाच भाग आहे. युद्धात जीवितहानीचा धोका कमी करण्यासाठी ‘नो कॉन्टॅक्ट वॉरफेअर’ भर दिला जात असून ‘कामिकाझी ड्रोन्स’ भारताची ‘नो कॉन्टॅक्ट वॉरफेअर’ची क्षमता वाढविणार आहेत.

याशिवाय 10 ‘एरियल टार्गेटिंग सिस्टिम लायटेरिंग म्युनिशन’साठी आरएपी काढण्यात आले असून हीसुद्धा जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी प्रणाली व ड्रोन यंत्रणा मिश्रण असणारी यंत्रणा आहे. ही यंत्रणा ड्रोनसारखे काम करते, अधिक वेळ हवेत राहून आपले लक्ष्य हेरून मग हल्ला करते.

leave a reply