इराण रशियाकडे आण्विक साहित्य व इंधनाची मागणी करीत आहे

अमेरिकन वृत्तवाहिनीचा इशारा

वॉशिंग्टन/तेहरान – गेल्या काही दिवसांपासून रखडलेला अणुकार्यक्रम गतिमान करण्यासाठी इराणने रशियाकडे सहाय्य मागितले आहे. रशियाने आण्विक साहित्य व इंधनाचा पुरवठा करावा, अशी मागणी इराणने केली. रशियाने इराणची ही मागणी मान्य केली का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण सदर सहाय्य मिळाल्यास अणुबॉम्ब निर्मितीचा इराणचा ‘ब्रेकआऊट टाईम’ कमी होईल, असा दावा ‘सीएनएन’ या अमेरिकी वृत्तवाहिनीने केला आहे.

Russia-and-Iran-Relationsबायडेन प्रशासनाने इराणबरोबरचा 2015 सालचा अणुकरार पुनर्जीवित करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून वाटाघाटी सुरू केल्या होत्या. या वाटाघाटींना यश मिळाल्याचे दावे बायडेन प्रशासन व युरोपिय देशांनी केले होते. पण महिन्याभरापूर्वी अमेरिका व इराणमधील या वाटाघाटी रखडल्या असून इराणला नवा प्रस्ताव देण्यात अमेरिका आपला वेळ फुकट घालविणार नसल्याचे बायडेन प्रशासनाने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर, आपला अणुकार्यक्रम गतिमान करण्यासाठी इराणने रशियाकडे विचारणा केल्याचा दावा, सीएनएन या वृत्तवाहिनीने अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने केला.

इराणने रशियाकडे अणुकार्यक्रमासाठी आवश्यक आण्विक साहित्य व इंधनाची मागणी केली. यातील तपशीलांचा खुलासा सदर अधिकाऱ्यांनी केलेला नाही, असे अमेरिकी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. पण आत्तापर्यंत इराणच्या अणुकार्यक्रमाचे समर्थन करीत असलेल्या रशियाने ही मागणी मान्य करून आण्विक साहित्य व इंधन पुरविले तर इराण अणुबॉम्बनिर्मितीच्या जवळ पोहोचेल, असा इशारा अमेरिकी वृत्तवाहिनीने दिला आहे.

अण्वस्त्रसज्ज इराण अजिबात खपवून घेणार नसल्याचा इशारा इस्रायलने याआधी दिला होता. अशापरिस्थितीत सत्ताबदलानंतर इस्रायलची सूत्रे नव्याने हाती घेणाऱ्या बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याकडून रशिया व इराणमधील या संभाव्य सहकार्यावर इस्रायलकडून प्रतिक्रिया येऊ शकते, असे अमेरिकी वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे. तर इस्रायल व रशियामधील संबंधात तणाव वाढेल, याकडे इस्रायली माध्यमे लक्ष वेधत आहेत.

दरम्यान, बायडेन प्रशासनाने इराणबरोबर सुरू केलेल्या वाटाघाटींवर नेत्यान्याहू यांनी याआधी जोरदार टीका केली होती. आजही आपल्या या भूमिकेत अजिबात बदल झाला नसल्याचे नेत्यान्याहू आवर्जून सांगत आहेत. अण्वस्त्रसज्जतेकडे जाणाऱ्या इराणच्या अणुकार्यक्रमावर हल्ला चढविण्यासाठी कुणाच्याही आदेशांची वाट पाहणार नसल्याचे नेत्यान्याहू यांनी ठणकावले होते.

leave a reply