अमेरिका व युरोपिय बँकांच्या दिवाळखोरीमुळे आलेल्या संकटाचा सामना करण्याची क्षमता भारतीय बँक क्षेत्राकडे आहे

- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास

वॉशिंग्टन – सिलिकॉन व्हॅली बँक-एसव्हीबी ही अमेरिकेची तर स्यूस क्रेडिट ही स्वित्झर्लंडची बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर, जगभरात चिंतेचे वातावरण आहे. पुढच्या काळात अमेरिका व युरोपातील आणखी काही बँका दिवाळखोरीत जातील, असे इशारे दिले जात आहेत. यामुळे २००८ साली आले होते, त्याहूनही भीषण आर्थिक संकट जगावर कोसळेल, असे काही अर्थतज्ज्ञांनी बजावले आहे. जगभरातील बँकिंग क्षेत्र अशारितीने धोक्यात आलेले असताना, भारतीय बँकांना हा धोका संभवत नसल्याचा निर्वाळा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी दिला.

अमेरिका व युरोपिय बँकांच्या दिवाळखोरीमुळे आलेल्या संकटाचा सामना करण्याची क्षमता भारतीय बँक क्षेत्राकडे आहे - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दासभारताची बँकिंग व्यवस्था चिवट, स्थिर आणि सशक्त आहे, असा विश्वास व्यक्त रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी व्यक्त केला. अमेरिका व युरोपिय बँका दिवाळखोरीत जात असल्या तरी त्याचा परिणाम भारताच्या बँक क्षेत्रावर होणार नाही. कारण भारताची आर्थिक व बँकिंग व्यवस्था या संकटांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे, असे गव्हर्नर शक्तिकांता दास पुढे म्हणाले. बँक क्षेत्रातील निकषांचा विचार केला, तर भारतीय बँकांकडे पुरेशा प्रमाणात भांडवल उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक बँक व एकंदरीत बँकिंग व्यवस्थेत पुरेशा प्रमाणात रोखता उपलब्ध असून आर्थिक ताण सहन करण्याची पर्याप्त क्षमता भारतीय बँकांकडे असल्याचा दावा शक्तिकांता दास यांनी केला. यामुळे भारतीय बँकिंग व्यवस्था पूर्णपणे सशक्त असल्याचे सांगून अमेरिका व युरोपिय बँकांमधील घडामोडींचा परिणाम त्यावर होणार नाही, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पुढे म्हणाले.

गेल्या काही वर्षात रिझर्व्ह बँकेने आपली व्यवस्था अधिक भक्कम व कडेकोट करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत. यामध्ये बँकिंग व्यवस्थेबरोबरच बँक क्षेत्रात न येणाऱ्या वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांवरील देखरेख व नियंत्रणाचा समावेश आहे. आर्थिक संकट येईपर्यंत अशा उपाययोजना करण्याची वेळ आम्ही येऊ दिलेली नाही. आधीपासूनच रिझर्व्ह बँकेने आर्थिक संकट उद्भवणार नाही, यासाठी पुरेशी दक्षता घेतलेली आहे, असे शक्तिकांता दास पुढे म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या शक्तिकांता दास यांनी भारताच्या बँक क्षेत्राबाबत केलेली ही विधाने लक्षवेधी ठरतात.

अमेरिका व युरोपिय देशांच्या बँका आर्थिक संकटात आलेल्या असताना, त्यांच्या दिवाळखोरीमुळे जगाला नव्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा केवळ अर्थतज्ज्ञच नाही तर जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडूनही दिला जात आहे. अशा परिस्थितीत भारतीय बँका या संकटाला तोंड देण्याची क्षमता बाळगून आहेत, हा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी व्यक्त केलेला विश्वास अतिशय महत्त्वाचा ठरतो. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय अर्थव्यवस्थेची विश्वासार्हता अधिकच वाढेल.

भारताच्या रुपयामध्ये व्यवहार करण्यासाठी आता विकसित देश देखील उत्सुकता दाखवित आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक अनिश्तितेच्या काळातही भारत विश्वासार्ह अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येत आहे आणि भारताच्या बँका विकसित देशांपेक्षाही अधिक भक्कमपणे आर्थिक संकटाला तोंड देऊ शकतात, याचे संकेत मिळू लागले आहेत. यामुळे भारतात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ प्रचंड प्रमाणात वाढू शकतो. त्याचवेळी भारताबरोबर आर्थिक सहकार्य विकसित करण्यासाठी जवळपास सर्वच देशांमध्ये अधिक तीव्र स्पर्धा पेटल्याचे पुढच्या काळात दिसू शकेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच केंद्रीय व्यापारमंत्री पियूष गोयल सातत्याने याची जाणीव करून देत आहेत.

leave a reply