8 टक्के विकासदरात सातत्य राखल्यास 30 वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलर्सवर जाईल

- केंद्रीय व्यापारमंत्री पियूष गोयल

तिरुपूर  – वर्षाकाठी 8 टक्के विकासदर कायम राखला तर भारताची अर्थव्यवस्था पुढच्या तीस वर्षात 30 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत झेप घेईल, असा विश्वास केंद्रीय व्यापारंमत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केला आहे. सध्या तीन ट्रिलियन डॉलर्सवर असलेली भारतीय अर्थव्यवस्था तीन दशकात ही उंची गाठू शकते, हे व्यापारमंत्र्यांनी आत्मविश्वासाने सांगितले. काहीजणांचा यावर विश्वास बसत नाही, पण अर्थव्यवस्था इतक्या उंचीवर नेण्याची क्षमता आपल्याकडे आहे आणि त्याचा वापर करून हे ध्येय गाठता येईल, असा संदेश व्यापारमंत्री गोयल यांनी दिला.

तिरुपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एक कार्यक्रमात उद्योगमंत्र्यांनी देशाच्याअर्थव्यवस्थेबाबत महत्त्वाकांक्षी घोषणा केल्या. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार तीन ट्रिलियन डॉलर्स (तीन लाख कोटी डॉलर्स) इतका आहे. देश सातत्याने आठ टक्के विकासदराने प्रगती करीत राहिला तर पुढच्या नऊ वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.5 ट्रिलियन डॉलर्सवर जाईल. त्याच्या पुढच्या नऊ वर्षात अर्थात 18 वर्षांनी भारतीय अर्थव्यवस्था 13 ट्रिलियन डॉलर्सवर गेलेली असेल. तर 27 वर्षांनी अर्थव्यवस्था 26 ट्रिलियनपर्यंत जाईल. हे गणित लक्षात घेतले तर, पुढच्या 30 वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलर्सचे ध्येय सहजपणे गाठू शकते, असे केंद्रीय व्यापारमंत्र्यांनी म्हटले आहे.

आपण करीत असलेले हे दावे अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे वाटत असेल, तर त्यांनी तिरुपूरमध्ये यावे. इथे वस्त्रोद्योगाने केलेली प्रगती व तरुण उद्योजकांनी दाखविलेल्या कल्पकतेचा अनुभव घ्यावा, असे व्यापारमंत्री गोयल म्हणाले. सध्या भारताचा वस्त्रोद्योग 10 लाख कोटी रुपये इतका आहे. तसेच वस्त्रोद्योगाद्वारे देशातून केली जाणारी निर्यात सध्या 3.5 लाख कोटी रुपये इतकी आहे. पुढच्या पाच वर्षात हा उद्योग 20 लाख कोटी रुपयांवर नेण्याचे तसेच याची निर्यात 10 लाख कोटी रुपयांवर नेण्याचे ध्येय वस्त्रोद्योग मंत्रालयाने आपल्यासमोर ठेवले आहे, अशी माहिती व्यापारमंत्र्यांनी दिली.

असे घडू शकणार नाही, असे काही निराशावाद्यांना वाटते. पण मी मात्र याबाबत आशावादी आहे. 30 वर्षात अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याची क्षमता आपल्याकडे आहे, आपण तसे करू शकतो किंबहुना आपण हे घडवून आणू, असे सांगून केेंद्रीय मंत्र्यांनी उद्योगक्षेत्राचा उत्साह वाढविला आहे. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्ध तसेच कोरोनाच्या साथीमुळे निर्माणझालेल्या परिस्थितीने देशासमोर काही आव्हाने उभी राहिलेली आहे. यामुळे उत्पादनासाठी आवश्यक असलेला पुरवठा कमी झाला आहे. तरीही या साऱ्या अडथळ्यांवर मात करून भारतीय अर्थव्यवस्था पुढे चालली आहे, याकडे पियूष गोयल यांनी लक्ष वेधले.

leave a reply