पाकिस्तानबरोबरील संघर्षबंदी मोडीत काढण्याची ‘तेहरिक’ची धमकी

इस्लामाबाद – पाकिस्तानची राज्यघटना आणि संसदेच्या चौकटीतच ‘तेहरिक-ए-तालिबान’शी चर्चा पार पडेल. तसेच शस्त्रे खाली ठेवून ‘तेहरिक’ला पाकिस्तानशी वाटाघाट कराव्या लागतील, असे पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री राणा सनाउल्ला यांनी जाहीर केले हेोते. मात्र तेहरिकने पाकिस्तानच्या मंत्र्यांची खिल्ली उडवून या देशाला थरकाप भरविणारा नवाइशारा दिलाआहे. जर तेहरिकच्या मागण्या मान्य होणार नसतील, तर पाकिस्तानबरोबरील संघर्षबंदी मोडीत निघेल आणि साऱ्या पाकिस्तानात आपल्या मागण्यांसाठी रक्तपात घडविण्यासाठी तेहरिकचे मुजाहिद्दीन सक्रीय होतील, असे या संघटनेने बजावलेआहे.

अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर पाकिस्तानातील तालिबानची शाखा मानल्या जाणाऱ्या ‘तेहरिक’च्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानातील आपल्या कारवाया वाढविल्या होत्या. अफगाणिस्तानचा कब्जा तालिबानने घेतला, तसाच संघर्ष करून आपण पाकिस्तान ताब्यात घेऊ, असे दावे तेहरिकने केले होते. तेहरिकच्या घातपाती कारवाया रोखण्यासाठी पाकिस्तानने या दहशतवादी संघटनेशी वाटाघाटी सुरू केल्या. याला काही काळासाठी यश मिळाले व तेहरिकने पाकिस्तानी लष्कराशी संघर्षबंदी झाल्याचे जाहीर केले.

ही संघर्षबंदी कायमस्वरूपी नसून अल्पकाळासाठी असल्याचे तेहरिक पाकिस्तानला बजावत आहे. रक्तपात टाळायचा असेल, तर पाकिस्तानने तेहरिकचा प्रभाव असलेल्या इलाक्यांमध्ये तेहरिकला अपेक्षित असलेले कायदे लागू करावे अशी मागणी या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानसमोर ठेवली. याबरोबरच पाकिस्तानच्या ‘फेडरली ॲडमिनिस्ट्रेटेड ट्रायबल एरिया-फाटा’ प्रांताचे खैबर पख्तूनख्वामध्ये केलेले विलिनीकरण रद्द करण्याची मागणीही तेहरिकने पाकिस्तानच्या सरकारसमोर ठेवली आहे.

तेहरिकच्या या दोन्ही मागण्या मान्य करता येणार नाही. पाकिस्तानच्या राज्यघटनेच्या चौकटीतच तेहरिकला चर्चा करावी लागेल. तसेच पाकिस्तानी संसदेने केलेल्या कायद्यांना तेहरिक आव्हान देऊ शकत नाही, असे अंतर्गत सुरक्षामंत्री राणा सनाउल्ला यांनी बजावले आहे. यामुळे पाकिस्तानची तेहरिकबरोबरील चर्चा फिस्कटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या वाटाघाटी यशस्वी व्हाव्या, याकरीता अफगाणिस्तानातील तालिबानच्या हक्कानी गटाचे नेते जोरदार प्रयत्न करीतआहेत. पण सध्या तरी त्यांना या आघाडीवर यश मिळालेले नाही. उलट तेहरिक अधिकच आक्रमक बनली असून साऱ्या पाकिस्तानातील आपले मुजाहिद्दीन नव्याने संघर्ष करण्यासाठी सज्ज आहेत, असा इशारा तेहरिकने दिला.

तेहरिकच्या दहशतवाद्यांनी याआधी पाकिस्तानात भयंकर रक्तपात घडवून आणला होता. त्यामुळे या दहशतवादी संघटनेकडून आलेल्या नव्या धमकीवर पाकिस्तानची माध्यमे चिंता व्यक्त करीत आहेत. तर काहीजण पाकिस्तानच्या सरकारने तेहरिकसमोर झुकून आपला दुबळेपणा दाखवू नये, अशी मागणी करीत आहेत. पण तेहरिक मात्र आम्हाला शस्त्रे खाली ठेवून शरणांगती पत्करण्याची सवय नाही, असे सांगून पाकिस्तानच्या लष्कराच्या मर्यादा दाखवून देत आहेत. थेट उल्लेख न करता 1971च्या युद्धात पाकिस्तानच्या लष्कराने भारतीय सैन्यासमोर गुडघे टेकले होते, याची आठवण तेहरिक पाकिस्तानला करून देत असल्याचे दिसते. असे कचखाऊ लष्कर आपल्यासमोर टिकाव धरू शकणार नाही, हा संदेश तेहरिक पाकिस्तानला देत आहे.

leave a reply