भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची इराण व तुर्कीशी चर्चा

दुसांबे – भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ताजिकिस्तानची राजधानी दुसांबेमध्ये दाखल झाले आहेत. दुसांबेमध्ये हार्ट ऑफ एशिया या अफगाणिस्तानविषयक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेदरम्यान, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची इराण आणि तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा पार पडली. सदर परिषदेला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी भारत व पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट होणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. पण भारताकडून या भेटीचा प्रस्ताव आलेला नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.

‘हार्ट ऑफ एशिया’साठी सुमारे ५० देशांचे प्रतिनिधी आले आहेत. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आपल्या या भेटीची सुरूवात इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांच्याबरोबरील द्विपक्षीय चर्चेने झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. यावेळी दोन्ही देशांमधील सहकार्य, विशेषतः छाबहार बंदराच्या विकासासंदर्भात विस्ताराने चर्चा झाल्याचे सांगितले जाते. भारत इराणचे छाबहार बंदर विकसित करीत असून या मार्गाने भारताने अफगाणिस्तानला आवश्यक गोष्टींचा पुरवठा सुरूही केला आहे. पुढच्या काळात छाबहार बंदराचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढणार असून इराणच्या या बंदराद्वारे अफगाणिस्तान व त्याच्याही पुढे जाऊन मध्य आशियाई देशांबरोबरील व्यापारी वाहतूक सुरू करण्याच्या प्रकल्पावर भारत वेगाने काम करीत आहे.

यामुळे भारताचे इराणबरोबरील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने इराणला दोन १४० टन वजनाच्या मोबाईल हार्बर क्रेन भेट दिल्या होत्या. तसेच भारताचे इराणबरोबरील इंधनविषयक सहकार्य देखील पूर्वपदावर येत आहे. दुसांबे ते चोरतूद येथे आठ पदरी महामार्गाचे काम सुरू आहे व भारताची ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ (बीआरओ) याचे काम करीत आहे. त्याची पाहणी करून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बीआरओचे कौतुक केले.

या दौर्‍यात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलूत कावूसोग्लू यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा पार पडली. भारत-तुर्की द्विपक्षीय संबंध आणि अफगाणिस्तानातील घडामोडी या चर्चेच्या अग्रस्थानी असल्याची माहिती जयशंकर यांनी दिली आहे. लवकरच तुर्की अफगाणिस्तानातील शांती प्रक्रियेसंदर्भात स्वतंत्र बैठकीचे आयोजन करणार आहे. भारतालाही या बैठकीचे आमंत्रण देण्यात आलेले आहे. दरम्यान, दुसांबे येथील या बैठकीत भारत व पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सहभागी होणार असल्याने, त्यांच्यात चर्चा होईल का, अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली होती. काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या लष्करामध्ये संघर्षबंदी लागू करण्यावर सहमती झाली होती. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान व लष्करप्रमुखांनी देखील भारताला चर्चेचा प्रस्ताव दिला होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू झाली तर मध्य आशियाई देशांबरोबरील व्यापारासाठी भारताला मार्ग खुला करून दिला जाईल, असे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी जाहीर केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर, परराष्ट्रमंत्री जयशंकर व परराष्ट्रमंत्री कुरेशी यांच्यात दुसांबे येथे चर्चा होऊ शकेल, असे दावे केले जात होते.

मात्र पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सदर चर्चेसाठी भारताकडून प्रस्ताव आलेला नसल्याचे जाहीर केले आहे.

leave a reply