जिबौतीतील अमेरिका व फ्रान्सच्या तळांवर हल्ले चढविण्यासाठी अल-शबाबची चिथावणी

मोगादिशू – सोमालियास्थित अल-शबाब या अल कायदा संलग्न दहशतवादी संघटनेने जिबौतीमधील अमेरिका आणि फ्रान्सच्या लष्करी तळांवर हल्ले चढविण्यासाठी चिथावणी दिली. याची दखल घेऊन अमेरिकेने या दहशतवादी संघटनेच्या संभाव्य हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, पुढच्या दोन आठवड्यांमध्ये जिबौतीमध्ये निवडणूक पार पडणार आहे. त्याआधी अल-शबाबने दिलेल्या या चिथावणीवर चिंता व्यक्त केली जाते.

गेल्या सहा वर्षांपासून सोमालिया आणि केनियातील अल-शबाबच्या कारवायांचे नेतृत्व करणार्‍या ‘अबू ओबैदा अहमद ओमर’चा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला. यामध्ये अहमद ओमर याने जिबौतीचे राष्ट्राध्यक्ष इस्माईल ओमर ग्युलेह यांच्यावर टीका केली. ग्युलेह यांच्या राजवटीत जिबौती दुसर्‍या देशांच्या लष्करांचे तळ बनत चालल्याचा आरोप अल-शबाबच्या प्रमुखाने केला. या लष्करी तळांचा वापर पूर्व आफ्रिकेतील इस्लामधर्मियांविरोधात युद्ध छेडण्यासाठी केला जात असल्याचा ठपका अहमद ओमरने ठेवला. म्हणूनच जिबौतीतील अमेरिका व फ्रान्सचे लष्करी तळ तसेच हितसंबंधांना लक्ष्य करणारे हल्ले चढवा, असे आवाहन अल-शबाबच्या प्रमुखाने केले.

जिबौतीतील तरुणांनी लोन वुल्फ अर्थात एकट्यानेच हल्ले चढवून अमेरिकी आणि फ्रेंचांना जिबौतीतून पिटाळून लावावे, असा संदेश अल-शबाबच्या प्रमुखाने आपल्या समर्थकांना दिला. या हल्ल्यांसाठी तयार असणार्‍या तरुणांना आश्रय आणि प्रशिक्षण देण्याची तयारी या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाने व्यक्त केली.

अमेरिकेच्या आफ्रिका कमांडचे प्रवक्ते कर्नल ख्रिस्तोफर कर्न्स यांनी अल-शबाबच्या प्रमुखाने व्हिडिओद्वारे दिलेल्या धमकीची दखल घेण्यात आल्याचे म्हटले आहे. पूर्व आफ्रिकेतील अमेरिकेच्या हितसंबंधांना अल-शबाबकडून धोका आहे. म्हणूनच अल-शबाबच्या नेटवर्कविरोधात अमेरिका गांभीर्याने कारवाई करीत असून ही दहशतवादी संघटना पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कर्नल कर्न्स यांनी स्पष्ट केले.

रेड सी आणि हिंदी महासागरी क्षेत्रातील सागरी मालवाहतूक तसेच नौदलांच्या हालचालींवर लक्ष्य ठेवण्यासाठी जगातील काही प्रमुख देशांनी जिबौतीमध्ये आपले लष्करी तळ तयार केले आहे. यामध्ये अमेरिकेचे चार हजार जवान तैनात असलेल्या जिबौतीतील सर्वात मोठ्या लष्करी तळाचा समावेश आहे. तर फ्रान्सचे सुमारे १५००, चीनचे हजार, जपान आणि इटलीचे जवळपास १०० ते २०० जवान इथे तैनात आहेत. चीनने जिबौतीमध्ये मालवाहू जहाजांसाठी बंदरही उभारले आहे.

सागरी वाहतुकीच्या दृष्टीने जिबौतीला फार मोठे स्थान असून याच कारणामुळे इंधन तसेच इतर व्यापारी वाहतुकीच्या सुरक्षेसाठी जिबौतीकडे पाश्‍चिमात्य तसेच चीन व जपानसारख्या देशांनी लक्ष केंद्रीत केले आहे. भारतही जिबौतीमध्ये आपला तळ निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशा परिस्थितीत अमेरिका व फ्रान्सच्या जिबौतीमधील तळांना लक्ष्य करण्यासाठी अल शबाबने दिलेल्या प्रक्षोभक संदेशाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्नही झाला, तरी त्याचे फार मोठे पडसाद उमटू शकतात. अमेरिकेच्या कर्नल कर्न्स यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून ही बाब ठळकपणे समोर येत आहे.

leave a reply