भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्रायल, दक्षिण कोरिया आणि ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा

नवी दिल्ली – इस्रायलचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनाझी यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. याद्वारे भारताबरोबरील संबंधाना आपण सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे इस्रायलच्या नव्या परराष्ट्रमंत्र्यांनी दाखवून दिले आहे. तसेच परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी मंगळवारी दक्षिण कोरिया आणि ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स आणि फोनवरून चर्चा केली.

२००७ ते २०११ सालापर्यंत अश्केनाझी इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख म्हणून कार्यरत होते. यांची नव्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारुन इस्रायलच्या परराष्ट्रमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अश्केनाझी यांनी सर्वात आधी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. उभय देशांमधील द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांमध्ये विकसित होत असलेली विशेष भागीदारी यावर दोन्ही नेत्यांची चर्चा पार पडल्याचे सांगितले जाते. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. तसेच अश्केनाझी यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असेही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

भारत आणि इस्रायलमध्ये १९९२ सालापासून राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्या पुढच्या काळात दोन्ही देशांमध्ये संरक्षण विषयक भागीदारी ही विकसित झाली. भारताला संरक्षण साहित्य व शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये इस्रायल आघाडीवर आहे. असे असले तरी भारताच्या पंतप्रधानांचा पहिला इस्रायल दौरा होण्यासाठी २०१७ साल उजाडावे लागले. पंतप्रधान मोदी यांच्या या इस्रायल भेटीनंतर उभय देशांमधील संबंध अधिक दृढ व व्यापक बनले होते. आता इस्रायलच्या परराष्ट्र धोरणात भारताला असाधारण महत्त्व असल्याचा संदेश नवे परराष्ट्रमंत्री अश्केनाझी यांनी सर्वात आधी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करून दिला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्री ‘कँग क्योंग व्हा’ यांच्याशीही चर्चा केली.

कोरोनाव्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीवर दोन्ही नेत्यांची चर्चा पार पडली. चीनमधून कोरोनाव्हायरसचा उगम झाल्याचे उघड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन हा सर्वात अप्रिय देश बनला आहे. म्हणूनच बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले प्रकल्प बंद करुन ते इतरत्र हलविण्याची तयारी केली आहे. यामध्ये कोरियन कंपन्यांचा समावेश असून यातील काही महत्त्वाच्या कंपन्या भारतात गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याबरोबरील चर्चेत याचा संदर्भ देऊन परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी कोरियन कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे भारताची अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

तसेच ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांच्याशीही भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची फोनवरुन चर्चा झाली. या चर्चेत कोरोनाची साथ आणि त्यानंतरची आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिस्थिती हे प्रमुख मुद्दे होते. कोरोनाव्हायरसची साथ आल्यानंतर ब्रिटनने चीनच्या विरोधात अंत्यत आक्रमक भूमिका स्वीकारुन अमेरिकेला साथ दिली आहे. या साथीबाबत बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या चीनच्या विरोधात उभ्या राहत असलेल्या चीनविरोधी आघाडीत ब्रिटनचे स्थान महत्त्वाचे असून या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेली चर्चा महत्त्वाची ठरते

leave a reply