श्रीलंकेच्या सागरी सीमेतील चिनी जहाजांवर भारतीय नौदलाची करडी नजर

नवी दिल्ली – गेल्या महिनाभरापासून श्रीलंकेच्या सागरी हद्दीत चीनची संशोधन आणि सर्वेक्षण करणारी जहाजे तळ ठोकून आहेत. या सागरी हद्दीत चीनचे पुरातन जहाज बुडाले होते. त्याच्या संशोधनांसाठी ही जहाजे तैनात करण्यात आल्याचे चीनने स्पष्ट केले. पण चीनच्या हिंदी महासागरातील महत्वाकांक्षा लक्षात घेऊन भारताने चिनी जहाजांच्या या हालचालींवर करडी नजर ठेवली आहे

गेल्या महिन्यात चीनची ही दोन जहाजे श्रीलंकेच्या कोलंबोच्या सागरी हद्दीत दाखल झाली होती. या जहाजांनी सध्या ज्या भागात नांगर टाकला आहे, तेथे १५व्या शतकात चीनचे पुरातन जहाज बुडाले होते, असा चीनचा दावा आहे. याच जहाजावर संशोधनांसाठी चीनने आपली जहाजे या सागरी क्षेत्रात धाडली आहेत. २०१४ साली चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी श्रीलंकेसोबत केलेल्या करारामुळे चिनी नौदलाची जहाजे श्रीलंकन सागरी हद्दीत सर्वेक्षण करु शकतात. हे सर्वेक्षण त्या कराराचाच एक भाग ठरतो. पण भारतीय नौदलाला चीनच्या या हेतूवर संशय आहे. यामागे चीनचा काही कट असावा, अशी शक्यता नौदलाने व्यक्त केली आहे.

यामुळे या क्षेत्रातील चीनच्या जहाजांवर भारतीय नौदलाची करडी नजर आहे. याआधीही चीनने अशी आगळीक केली होती. २०१२ सालापासून चिनी नौदलाचा हिंदी महासागर क्षेत्रातील वावर वाढला आहे. यामुळे भारताच्या सुरक्षा आणि हितसंबंधाला धोका संभवतो. हिंदी महासागरच नाही तर जपान, फिलिपाईन्स या देशांना ही चिथावून चीन त्यांच्या सागरी क्षेत्रात युद्धनौका धाडत आहे. पण चीनच्या या अरेरावीला हे देश जबरदस्त प्रत्युत्तर देत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलही सतर्क आहे.

leave a reply