हिंदी महासागर क्षेत्र जागतिक घडामोडींचे केंद्र बनत आहे – संरक्षण सचिव अजय कुमार

नवी दिल्ली – सध्या फार मोठ्या उलथापालथी सुरू असलेल्या साऊथ चायना सी सागरी क्षेत्रानंतर हिंदी महासागर जागतिक घडामोडींचे केंद्र बनत आहे. हे लक्षात घेऊन भारताने सागरी क्षेत्राशी निगडीत असलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देऊन यासाठी आपली क्षमता विकसित करायला हवी, असे संरक्षण सचिव अजय कुमार यांनी म्हटले आहे. हिंदी महासागर क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत असलेल्या चीनला रोखण्यासाठी भारताने तयारी करायला हवी, असे संरक्षण सचिव वेगळ्या शब्दात सांगत आहेत. ‘मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज’ या अभ्यास गटानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात संरक्षण सचिव अजय कुमार बोलत होते.

सध्या साऊथ चायना सी क्षेत्रात तणावाचे वातावरण असून चीन या संपूर्ण सागरी क्षेत्रावर आपला अधिकार सांगत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील इतर देशांनी चीनच्या विरोधात एकजूट केली असून अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया हे देश चीनच्या विरोधात खडे ठाकलेल्या छोट्या देशांना आपले समर्थन देत आहेत. अमेरिकन नौदलाची गस्त या सागरी क्षेत्रात सुरू असून ऑस्ट्रेलियाचे नौदल देखील इथे गस्त घालून चीनच्या अरेरावीला प्रत्युत्तर देत आहे. अशा फार मोठ्या घडामोडी सुरू असलेल्या साऊथ चायना सी क्षेत्रानंतर हिंदी महासागर अशाच घडामोडींचे केंद्र बनत आहे, हे संरक्षण सचिव अजय कुमार यांनी केलेले विधान सूचक ठरते. याद्वारे चीन हिंदी महासागर क्षेत्रातही आपल्या महत्त्वाकांक्षेचा विस्तार करीत असल्याचे संकेत अजय कुमार यांनी दिले आहेत.

चीनने खोल समुद्रात मासेमारी करण्याचे तंत्र अवगत केले असून याचा फार मोठा लाभ चीनचे मच्छीमार उचलत आहेत. तसेच सागरी संपत्तीशी निगडीत अर्थव्यवस्थेचा चीनने योजनाबद्धरीत्या विकास केला आहे. भारत मात्र या आघाडीवर खूपच मागे आहे. भारतीय मच्छिमार खोल समुद्रात जाऊन मच्छीमारी करू शकत नाहीत. कारण त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान त्यांच्याकडे नाही. तसे त्याकरिता लागणारे सुरक्षेचे छत्र देखील त्यांना उपलब्ध नाही. म्हणूनच भारत अजूनही आपल्या विशेष सागरी आर्थिक क्षेत्रास देखील पूर्णपणे लाभ देऊ शकलेला नाही. पण पुढच्या काळात भारताला ही क्षमता विकसित करावी लागेल. केवळ मच्छीमारीतून नाही तर सागरी खनिज व साधन संपत्तीचा उपसा करण्यासाठी ही भारताला पावले उचलावी लागतील, असे संरक्षण सचिव अजय कुमार यांनी म्हटले आहे. यासाठी भारताने खोल सागरी क्षेत्राशी निगडित असलेल्या अर्थकारणाला गती द्यायला हवी ,अशी अपेक्षा यावेळी संरक्षण सचिवांनी व्यक्त केली. यामध्ये भारतीय नौदलाची ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे संकेत अजय कुमार यांनी दिले आहेत. केवळ नौदलच नाही तर भारतीय वायुसेनालाही सागरी क्षेत्राशी निगडित असलेली आपली क्षमता वाढवावी लागेल, असे संरक्षण सचिवांनी म्हटले आहे. अतिशय मोजक्या व सूचक शब्दात संरक्षण सचिव अजय कुमार यांनी हिंदी महासागर क्षेत्राला चीनच्या वर्चस्ववादी धोरणापासून असलेला धोका मांडल्याचे दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजय कुमार यांच्या या विधानांना फार मोठे सामरिक महत्त्व आल्याचे दिसते.

जगभरातील प्रमुख देश कोरोनाव्हायरसच्या साथीचा मुकाबला करण्यात गुंतलेले असताना याचा लाभ घेऊन चीन साऊथ चायना सी क्षेत्र व हिंदी महासागरात आपल्या नौदलाचा वावर वाढवीत आहे. नुकत्याच यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र चीनचा धोका ओळखून अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांनी साऊथ चायना सी मधील आपली गस्त वाढविली आहे. तर हिंदी महासागर क्षेत्रात भारतीय नौदल अतिशय सावधपणे चीनच्या कारवायांवर नजर ठेवून आहे. पुढच्या काळात या सागरी क्षेत्रातील आपली सुरक्षा व आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी भारताला अधिक आक्रमक भूमिका स्वीकारावी लागेल व त्यासाठी चीनशी टक्कर घेण्याचीही तयारी ठेवावी लागेल, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी हीच बाब मुत्सद्देगिरीच्या भाषेत मांडल्याचे दिसते.

leave a reply