पाकिस्तानच्या सरकारी वेबसाईटने पीओके भारताचा भाग दाखवल्याने पाकिस्तानात खळबळ – भारतीयांच्या उत्साहाला उधाण

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसच्या साथीची माहिती देणाऱ्या पाकिस्तानातील सरकारी वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या नकाशात ‘पीओके’ हा पाकिस्तानचा नाही, तर भारताचा भूभाग असल्याचे दाखविण्यात आले आहे. यानंतर पीओके हा भारताचा भूभाग असल्याचे पाकिस्तानने मान्य केले का, असा प्रश्न विचारून भारतीय यावर आनंद व्यक्त करीत होते. भारतीय माध्यमे आणि सोशल मीडियावर याची उत्साहाने चर्चा होत असतानाच, पाकिस्तानची माध्यमे आणि पत्रकार आपल्या सरकारच्या नावाने बोटे मोडीत असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे ‘पीओके’बाबत पाकिस्तानला वाटत असलेली असुरक्षितता व अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच भारताचा हवामान विभागाने पाकिस्तान व्याप्त काश्मीर अर्थात ‘पीओके’मधील हवामानाचे वृत्तांत देण्यास सुरुवात केली होती. पीओके हा पाकिस्तानने बळकावलेला भारताचा अधिकृत भाग आहे असे सांगून हवामान विभागाने पीओके मधील हवामानाचे वृत्त देण्यास सुरुवात केली होती. याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या हवामान विभागाने देखील श्रीनगर, पुलवामा व लडाखमधील हवामानाची माहिती दिली. पण भारताला उत्तर देण्याच्या नादात पाकिस्तानशी स्वतःचेच हसे करून घेतले. कारण या ठिकाणचे पाकिस्तानने सांगितलेले तापमान चुकीचे होते. त्यातच आता पाकिस्तानच्या सरकारी वेबसाईटवर पीओके भारताचा भाग असल्याचे दाखविण्यात आल्याने या देशातील भारतद्वेष्ट्या गटांचा संताप अनावर झाला आहे.

पाकिस्तान सरकारने आपल्या देशातील कोरोनाव्हायरसच्या साथीची माहिती देण्यासाठी एक वेबसाईट तयार केली आहे. ह्या वेबसाईटवर कोरोनाच्या साथीचा विविध भूभागावरील प्रभाव दाखवण्यासाठी एक नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या नकाशामध्ये ‘पीओके’ भारताचाच भूभाग असल्याचे दाखविण्यात आले आहे. हा नकाशा प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या भारतीयांनी इम्रान सरकारवर शेरेबाजी सुरू केली. अखेर पीओके हा आपला भूभाग नाही, भारताचा आहे, हे पाकिस्तानने मान्य केलेच. पाकिस्तानच्या सरकारी वेबसाईटने पीओके भारतात दाखवून तशी कबुलीच दिल्ली आहे, असा दावा भारतीय माध्यमेही करू लागली. यानंतर पाकिस्तान सरकारने घाईघाईने हा नकाशा या वेबसाईटवरुन काढून टाकला. पण तोपर्यंत फार उशीर झाला, असे सांगून पाकिस्तानी माध्यमांनी इम्रान सरकारला यासाठी धारेवर धरले.

‘पीओके’ला भारताचा भूभाग दाखवून पंतप्रधान इम्रान खान यांनी आपले अपयश मान्य तर केले नाही ना, असा उद्विग्न सवाल पाकिस्तानी माध्यमांमध्ये पाकिस्तानी विश्लेषक करीत आहेत. काश्मीर प्रकरणी भारत अतिशय आक्रमक लष्करी व परराष्ट्र धोरण राबवित आहे. त्यासमोर इम्रान खान यांच्या सरकारचा निभाव लागलेला नाही. हे सरकार भारता समोर असहाय्य असल्याचे दिसत आहे, अशी खंत पाकिस्तानातील विश्लेषक व्यक्त करीत आहेत. पाकिस्तानातील भारतद्वेष्ट्या विश्लेषकांचा गट देखील भारताच्या काश्मिरविषयक भूमिकेवर टीका करीत असताना, भारत सरकारच्या मुत्सद्देगीरीची प्रशंसा करीत आहे. यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारचा नाकर्तेपणा अधिक ठळकपणे जगासमोर येत असल्याचे शेरे हे विश्लेषक मारत आहेत.

सरकारी वेबसाईटवर झालेल्या या चुकीमुळे पाकिस्तानच्या वैफल्यात अधिकच भर पडलेली असताना, भारतीय मात्र त्यावर आनंद व्यक्त करीत असून लवकरच पीओके देखील प्रत्यक्षरित्या देशाशी जोडले जाईल व यामध्ये गिलगिट बाल्टिस्तानचाही समावेश असेल, असा विश्वास व्यक्त करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पीओके वर भारताचे प्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित होईल, असा दावा केला होता. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी देखील आज ना उद्या पीओके भारताला मिळेल, असे ठासून सांगितले होते. भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत व लश्करप्रमख जनरल मनोज मुकुंद नरवणे तसेच वायुसेनाप्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी पीओकेवर कारवाईसाठी संरक्षणदलाची पूर्ण तयारी असल्याची घोषणा नुकतीच केली होती.

leave a reply