भारताचा रुपया लवकरच आंतरराष्ट्रीय चलन बनेल

- केंद्रीय व्यापारमंत्री पियूष गोयल

राजकोट – लवकरच भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार रुपयामध्ये होईल. यासाठी इतर देशांच्या बँकां भारतीय बँकांमध्ये वोस्त्रो खाती उघडत आहेत. यासाठी रिझर्व्ह बँकेकडे 18 देशातील 60 परदेशी बँकांनी परवानगी मागितलेली आहे. या देशांमध्ये ब्रिटन, सिंगापूर आणि न्यूझीलंडचाही समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी दिली. तसेच भारत प्रमुख देश व देशांच्या संघटनांबरोबर मुक्त व्यापारी करारावर वाटाघाटी करीत असून हे करार संपन्न झाले तर त्याचा फार मोठा लाभ देशाला मिळेल, असा विश्वास व्यापारमंत्र्यांनी व्यक्त केला. विशेषतः भारतीय वस्त्रोद्योगाला याचा विशेष फायदा मिळाले, असे केंद्रीय व्यापारमंत्री पुढे म्हणाले.

भारताचा रुपया लवकरच आंतरराष्ट्रीय चलन बनेल - केंद्रीय व्यापारमंत्री पियूष गोयलगुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वस्त्रोद्योगाशी निगडीत कार्यक्रमात बोलताना व्यापारमंत्र्यांनी ही माहिती दिली. भारताच्या रुपयामध्ये व्यापार करण्यासाठी प्रमुख देश देखील उत्सुकता दाखवित आहेत. त्यामुळे लवकरच रुपया आंतरराष्ट्रीय चलन बनेल, असा विश्वास पियूष गोयल यांनी व्यक्त केला. यासाठी प्रमुख देशांनी पावले उचलली असून रिझर्व्ह बँक या देशांच्या मध्यवर्ती बँकांशी चर्चा करीत असल्याचे व्यापारमंत्री पियूष गोयल पुढे म्हणाले. भारताचा रुपया अशारितीने आंतरराष्ट्रीय चनल बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना, प्रमुख देश व त्यांच्या संघटनांशी भारत मुक्त व्यापारावर करीत असलेल्या वाटाघाटींचीही माहिती पियूष गोयल यांनी दिली.

युरोपिय महासंघ, ब्रिटन आणि कॅनडा यांच्याबरोबरील भारताची मुक्त व्यापारी करारावरील चर्चा प्रगतीपथावर आहे. त्याचवेळी युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट (इफटीए) तसेच गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल (जीसीसी) आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियन (ईएईयू) यांच्याबरोबरही भारत मुक्त व्यापारी करारावर वाटाघाटी करीत आहे. याचा दाखला देऊन साऱ्या जगाला भारताबरोबरील आपली आर्थिक भागीदारी विकसित करायची आहे, याची जाणीव व्यापारमंत्र्यांनी यावेळी करून दिली. तसेच यापासून भारतीय उद्योगक्षेत्राला फार मोठा लाभ मिळणार असल्याचेही पियूष गोयल पुढे म्हणाले.

वस्त्रोद्योग हा देशाच्या शेती व उद्योगासाठीही महत्त्वाचा ठरतो. मात्र आधीच्या काळात भारताला वस्त्रोद्योगाशी निगडीत निर्यात करताना, इतर देशांच्या सीमाशुल्काचा फटका बसत होता. त्याच्या तुलनेत बांगलादेश अधिक सुलभतेने वस्त्रोद्योगाशी निगडीत निर्यात करीत होता. पण युएई व ऑस्ट्रेलिया या देशांबरोबर भारताचा मुक्त व्यापारी करार संपन्न झाल्यानंतर, वस्त्रोद्योगाशी निगडीत असलेली या देशांमधील भारताची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढेल, असा दावा पियूष गोयल यांनी केला.
दरम्यान, देशभरातील कपाशीवर सध्या किड लागली असून यामुळे कापसाचे उत्पादन बाधित होईल, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यावर कृषी मंत्रालय व इतर संबंधित विभाग मिळून मार्ग काढतील, असा दावा देखील यावेळी केंद्रीय व्यापारमंत्र्यांनी केला.

leave a reply